कूच बिहार करंडक स्पर्धा – पहिल्याच दिवशी विदर्भाची पहिल्या डावात आघाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। रायगड

मैदानावर सुरू असलेल्या कूच बिहार करंडक क्रिकेट स्पर्धेतील महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ एकोणीस वर्षा खालील मुलांच्या क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी विदर्भाच्या संघांनी पहिल्या डावात आघाडी घेतली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारलेल्या विदर्भाच्या गोलंदाजांनी सकाळच्या दमट वातावरणाचा फायदा घेत महाराष्ट्राच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. सुरुवातीच्या पाहिल्या तासात महाराष्ट्राचा निम्मा संघ तंबूत परतला होता.

विदर्भाचा जलदगती गोलंदाज नचिकेत भुते ह्यांनी 6 गडी बाद केले तर त्याचा साथीदार दुष्यंत टेकन याने 3 गडी बाद केले. विदर्भाच्या सलामीच्या गोलंदाजांनीच महाराष्ट्राचा पूर्ण संघ गारद केला. लंच पर्यंत महाराष्ट्र सर्व गडी बाद 110 धावा केल्या. त्यात हर्षल काटे च्या 38 तर सौरभ नवले यांनी 28 धावा काढल्या.

विदर्भाची सुरुवात चांगली झाली असं वाटत असताना महाराष्ट्राचा मध्यम गती गोलंदाज हर्षल काटे ह्यांनी विदर्भाच्या डावाला सुरुंग लावला. त्यांने 3 गडी बाद केले. चहापानानंतर पवन शहा ह्यांनी 2, राजवर्धन हँगरगेकर आणि सिद्धेश वीर ह्यानी प्रत्येकी एक गडी बाद केला. दिवसा अखेर विदर्भाच्या संघाचा 7 गडी बाद 127 धावा धावफलकावर होत्या. पहिल्या डावात विदर्भानी 17 धावांची आघाडी घेतली आहे.

तत्पूर्वी सामन्याचे उदघाटन रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणे विभागाचे आय आर प्रमुख विनय किर्लोस्कर, स्पोर्ट्स सेक्रेटरी उदय दिवेकर, इस्टेट ऑफिस इनचार्ज अजिंक्य पाटील रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते, उपाध्यक्ष प्रकाश पावसकर, कार्यउपाध्यक्ष जयंत नाईक, सेक्रेटरी विवेक बहुतुले ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. दोन्ही संघांचा तसेच सामन्याचे पंच सर्व सामना अधिकारी मंडळींचा ह्या वेळी सन्मान करण्यात आला. अजूनही तीन दिवसांचा खेळ शेष आहे. सामना रोमहर्षक होईल आणि सामन्याच्या निकाल लागेल अशी भविष्यवाणी उपस्थित क्रिकेट जाणकारांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.