ब्राह्मण समाजासाठीही आर्थिक विकास महामंडळ; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

ओबीसी तसेच मराठा समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ तयार करण्यात आले. त्याच धर्तीवर आता ब्राह्मण समाजासाठीही आर्थिक विकास महामंडळ तयार करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे. आंदोलनकर्त्या ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतल्यानंतर त्यांना हे आश्वासन देण्यात आले आहे.

मराठा समाजापाठोपाठ ब्राह्मण समाजानेही आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन पुकारले. या शिष्टमंडळाची मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. यावेळी ब्राह्मण समाजाला स्वतंत्र आरक्षणाची आवश्यकता नसून सवर्णांसाठी देण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणाचा लाभही त्यांना घेता येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. मात्र ब्राह्मण समाजाला स्वयंरोजगार तसेच अन्य सुविधांसाठी आर्थिक विकास महामंडळ सुरू करण्यात येईल. यासाठी समिती नेमण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे  ब्राह्मण समाजाचे समन्वयक अंकित काणे यांनी सांगितले.

पुण्यात पेशवेसृष्टी

पुण्यातील शनिवारवाडय़ात पेशवेसृष्टी उभारण्याची मागणीही मान्य करण्यात आली आहे. शनिवारवाडय़ात पेशव्यांच्या पराक्रमाची गाथा छायाचित्रांच्या माध्यमातून उभारली जावी यासाठी इतिहास संशोधकांची समिती नेमण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले  आहे.