
सामना प्रतिनिधी । नगर
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपट पाहण्यासाठी नगरकरांनी तुफान गर्दी केली. आज फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल झाला. तर पुढील शोची तिकीटेही आधीच संपली आहेत.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ठाकरे या भव्य चित्रपटाची निर्मिती केली आहे. आपल्या लाडक्या महानेत्याला एवढ्या भव्य स्वरुपात एकदम जवळून पाहता येणार असल्याने सारेच हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक होते. अखेर तो दिवस आला.
हा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायला मिळायला हवा म्हणून नगर भागात शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी फर्स्ट डे फर्स्ट शो बूक करून ठेवण्यात आला होता. त्यांच्याकडून हा शो शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांसह सामान्य जनतेला मोफत दाखवण्यात आला. चित्रपट गृहाच्या बाहेर शिवसेनाप्रमुखांचे प्रतिमा लावून त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ घोषणा देत प्रेक्षकांनी चित्रपटगृहात प्रवेश केला.

यावेळी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख अनिल कराळे, जिल्हा युवा सेनेचे अधिकारी विक्रम राठोड, शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक गणेश कवडे, संजय शेंडगे, मदन आढाव ,संतोष गणपा, रफिक शेख ,माजी महापौर भगवान फुलसौंदर गिरीश जाधव, महिला आघाडीच्या आशा निंबाळकर, अरुणा गोयल, तसेच शिवसैनिक पदाधिकारी युवा सेना महिला आघाडी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी, शिवसेनाप्रमुखांचे कार्य हे सर्व सामान्य जनते पर्यंत पोहोचले पाहिजे. युवा पिढीला या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांचे रूप पाहायला मिळणार आहे, आज शिवसैनिकांसाठी हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.





























































