
सामना प्रतिनिधी । नांदेड
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संपूर्ण आयुष्य प्रतिबिंबीत करणारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत निर्मित ‘ठाकरे’ हा चित्रपट देशभर प्रदर्शित झाला. नांदेड येथे युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी महेश खेडकर यांच्या पुढाकारातून आज ‘ज्योती कार्नीवल’मध्ये शिवसैनिक, युवासैनिक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांसाठी या चित्रपटाचा फर्स्ट डे, फर्स्ट शो मोफत ठेवला होता. क्षणाक्षणाला जय भवानी जय शिवाजीचा गजर, टाळ्यांचा कडकडाट आणि ‘हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’च्या घोषणांनी चित्रपटगृह दणाणून गेले. यावेळी चित्रपटगृहाबाहेर प्रचंड जयघोष आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी महेश खेडकर यांनी या प्रयोगाचे आयोजन केले होते. यावेळी शिवसेना आमदार हेमंत पाटील, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंदराव पाटील बोंढारकर, उमेश मुंडे यांच्यासह शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी, युवासेनेचे कार्यकर्ते व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व शिवसैनिकांनी या चित्रपटास हजेरी लावली.
शिवसेनाप्रमुखांच्या जीवनातील प्रसंग जिवंत करणारा चित्रपट पाहिल्याचा आनंद प्रेक्षकांनी आज ‘ज्योती कार्नीवल’मध्ये घेतला. शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेच्या वैभवापर्यंतचे सर्व प्रसंग या चित्रपटात मूर्तीमंत उभे केले आहेत. बाळासाहेबांचा स्वाभिमान, त्यांची जाज्वल्य राष्ट्रभक्ती, मराठी माणसाविषयीची अंतरीक तळमळ आणि मराठी माणसावर अन्याय करणाऱ्यांना त्यांच्याच शब्दात उत्तर देण्याची त्यांची ठाकरे शैली या सर्वांचे प्रतिबिंब या चित्रपटात अगदी हुबेहुब उमटले आहे. नवाजुद्दीन यांनी बाळासाहेबांची भूमिका अत्यंत प्रभावीपणे केली आहे. अमृता राव यांनीही माँ साहेब उत्कटपणे सादर केले आहेत.
प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
या चित्रपटाबद्दल बोलताना अॅड. प्रभाकर लोखंडे म्हणाले की, काहीही लपवून न ठेवता जे आहे ते स्पष्टपणे अन परखडपणे मांडण्याचा बाळासाहेब ठाकरे यांचा गुण या चित्रपटातून प्रकर्षाने लक्षात येतो. या चित्रपटामुळे बाळासाहेबांचे विचार तरुणांपर्यंत निश्चित पोहचतील आणि त्याचा परिणाम निश्चितपणे विधायक होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
विजय पवार रा. महादेव पिंपळगाव म्हणाले की, या चित्रपटामुळे आम्हाला बाळासाहेबांचे खरे दर्शन झाले. त्यांनी मराठी माणसासाठी जे हाल सोसले आणि जे प्रहार केले त्याची माहिती आम्हाला या चित्रपटातून मिळाली. नवाजुद्दीन यांचा अभिनय उत्कृष्ट होता. अमृता राव यांनीही माँ साहेबांची भूमिका उत्कृष्टपणे वठवली.
संतोष भारसावडे रा.महादेव पिंपळगाव म्हणाले की, हा चित्रपट बघून बाळासाहेबांचे आमच्या मनातील विचार अधिक दृढ झाले. हा चित्रपट प्रत्येक हिंदू बांधवांनी पाहिलाच पाहिजे, मराठी माणसासाठी बाळासाहेबांनी ज्या त्वेषाने लढा दिला त्याची जाणीव प्रत्येक प्रेक्षकास झाल्याशिवाय राहणार नाही.
सोनखेडचे गणेश मोरे म्हणाले की, माँ साहेब बाळासाहेबांचे पत्र वाचतानाचा प्रसंग हृदयद्रावक आहे. हा प्रसंग पाहताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.
प्रभाकर वानेगावकर म्हणाले की, बाळासाहेबांचे हिंदुत्ववाबद्दलचे विचार या चित्रपटातून स्पष्ट केले आहेत. शिवसेना कधीही मुस्लिमांविरुध्द नव्हती याचे स्पष्टीकरण बाळासाहेबांनी ज्या शब्दात केले आणि नवाजुद्दीन यांनी ते पडद्यावर प्रभावीपणे साकारले, त्यास तोड नाही.






























































