
सामना ऑनलाईन । मेलबर्न
सर्बियाच्या नोवाक जोकोविचने रविवारी स्पेनच्या रफाएल नदालचा धुव्वा उडवत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम पुरुष एकेरीच्या जेतेपदावर मोहोर उमटवली. गेल्या वर्षी विम्बल्डन व अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकणाऱया नोवाक जोकोविचचे हे विक्रमी सातवे ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद ठरले हे विशेष. याआधी रॉय इमरसन व रॉजर फेडरर यांनी सहा वेळा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकण्याची करामत करून दाखवली. नोवाक जोकोविचने 15 ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाला गवसणी घातली.
नंबर वन टेनिसपटू नोवाक जोकोविचने जेतेपदाच्या लढतीत नंबर टू खेळाडू रफाएल नदालवर 6-3, 6-2, 6-3 अशा फरकाने अगदी सहज विजय मिळवला. दोन महान टेनिसपटूंमधील लढत रोमहर्षक होईल अशी आशा बाळगणाऱया टेनिसप्रेमींच्या आशांना सुरुंग लागला. नोवाक जोकोविचच्या झंझावाती खेळासमोर रफाएल नदालची डाळ शिजली नाही. तीन सेटमध्येच सर्बियाच्या खेळाडूने झळाळता करंडक पटकावला.
चारपैकी तीन स्पर्धा जिंकण्यात यश
‘राफा’प्रमाणेच 12 महिन्यांपूर्वी मलाही शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले होते. दुखापतीमधून बाहेर येत चारपैकी तीन ग्रॅण्डस्लॅम जिंकण्यात यश लाभले. माझ्याकडून झालेल्या या कामगिरीबाबत शब्दच नाहीत, असे भावुक उद्गार नोवाक जोकोविच याने यावेळी काढले.

























































