
विजय जोशी । नांदेड
महाराष्ट्राचे भूमिपुत्र असलेल्या व सध्या केंद्रीय राखीव सुरक्षा दल झारखंड येथे पोलीस महानिरीक्षक असलेल्या नांदेड निवासी संजय लाठकर यांनी पाच नक्षलवाद्यांचा मंगळवारी पहाटे खात्मा केला. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त झाला आहे.
सध्या झारखंड भागात नक्षलवाद्यांच्या विरोधात जोरदार अभियान सुरु आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक संजय लाठकर यांच्या नेत़ृत्वातील कोब्रा बटालीयनला मिळालेल्या माहितीनुसार झारखंड मधील खुटी येथील अडकी क्षेत्रातंर्गत बंदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्रीपासून नक्षलवाद्यांच्या विरोधात जोरदार अभियान सुरु होते. संजय लाठकर यांच्या मार्गदर्शनाखाली विक्कीकुमार पांडे आणि जितेंद्रसिंह या अधिकाऱ्यांसह 54 जवान कार्यरत होते. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात गोळाबारी सुरु होती. मंगळवारी सकाळी कोब्रा बटालीयनने दोन लक्ष रुपये बक्षीस असलेल्या माओवाद्यांचा कमांडर प्रभू सहाय बोदरा यांच्यासह पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. अन्य दोन जण जखमी अवस्थेत पकडल्या गेले आहेत. यांच्याकडून दोन एक.के.रायफल, दोन 303 रायफल, पिस्टल, देशी पिस्टल, मोठ्या प्रमाणात काडतूस आणि मोठ्या प्रमाणात विस्फोटक सामुग्री सापडली आहे.
माओवाद्याचा कमांडर प्रभू सहाय बोदरा याने अनेकवेळा पोलिसांवर हल्ले केले होते. ज्यामुळे त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले होते. मात्र तो पळून जाण्यास यशस्वी झाला होता. गेल्या तीन वर्षात संजय लाठकर यांच्या नेतृत्वाखालील वेगवेगळ्या बटालियन पथकाने 38 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यासोबतच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात वेगवेगळे हत्यार देखील जप्त केले आहेत. माओवादी नक्षलवाद्यांच्या विरोधात महाराष्ट्राचा एक पोलीस अधिकारी जोरदार कामगिरी करत असल्याने संजय लाठकर यांच्या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.
























































