कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या वेरुळ केंद्राची दूरवस्था

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीकांत कुलकर्णी। वेरुळ

मोठा गाजावाजा करून उभारण्यात आलेल्या वेरुळ भेट केंद्राची दुरवस्था झाली आहे. कोटयवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेले केंद्र वापराअभावी धूळ खात पडून आहे.

महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाअंतर्गत असलेले वेरुळ भेट केंद्र जगप्रसिद्ध लेण्यांसमोरील भव्य जागेत उभारण्यात आले. यासाठी १५० कोटी रुपये खर्च करण्यात आले. वेरुळ लेण्या पाहण्यापूर्वी त्या पर्यटकांनी समजून घ्याव्यात, त्यांची माहिती व्हावी, या उद्देशाने हे केंद्र उभारण्यात आले. या केंद्रात लेणीविषयक विविध भाषांमधून माहिती देण्यासाठी अ‍ॅम्पी थिएटरसह विविध कला दालनांसाठीचे व्यावसायिक गाळे, देशी – विदेशी पर्यटकांसाठी उपाहारगृह, अलिशान बागबगीचा, मोठे वाहनतळ उभारण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन तत्कालीन केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री चिरंजीवी यांच्या हस्ते करण्यात आले.

हे पर्यटन केंद्र सुरू झाल्यानंतर पर्यटकांनी या केंद्राला भेट देऊनच लेणी पाहावयास जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून बससेवाही सुरू करण्यात आली होती. हे पर्यटन केंद्र खासगी तत्त्वावर चालविण्यास देण्यात आले होते. मात्र ते चालविणे परवडत नसल्याने खासगी कंपनीने केंद्र चालविणे बंद केले.

या पर्यटन केंद्राचा विद्युत पुरवठा अनेक महिन्यांपासून खंडित असून, शिवना टाकळी प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा प्रकल्पातच पाणी नसल्याने बंदच आहे. विद्युत पुरवठाही नसल्याने केंद्र परिसरात असलेल्या विहीर व विंधन विहिरीतील पाणी बगिच्याला देता येत नसल्याने लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेला बगिचा सुकला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेले केंद्र सध्या वापराअभावी पडून आहे. अवघ्या सहा कर्मचाऱ्यांच्या भरवशावर हा पांढरा हत्ती पोसण्याचे काम सुरू आहे. याकडे महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे दुर्लक्ष असून, पर्यटकांनीही पाठ फिरविल्याचे चित्र आहे.