
सामना ऑनलाईन, गडचिरोली
नक्षलवाद्यांनी आज हिंदुस्थान बंदचे आवाहन केले आहे. या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने संतापलेल्या नक्षलवाद्यांनी दहशत पसरवण्यासाठी 3 ट्रक जाळले आहेत. कोरची तालुक्यातील डोंगरगाव पोलीस मदत केंद्रापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावरील कोरची घाट येथे ही घटना घडली.
25 ते 31 जानेवारीदरम्यान नक्षलवाद्यांनी त्यांचा सप्ताह असल्याचे जाहीर केले आहे. या सप्ताहादरम्यान नक्षलवाद्यांनी कोरची रस्त्यावरील झाडे तोडून रस्ता बंद केला. रस्त्यात अडकलेले 3 ट्रक जाळून या भागात त्यांचे बॅनर उभारले. गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव जवळ असलेल्या जामगाव येथेही रस्ता कामांवरील ४ ट्रॅक्टर, २ जेसीबींची जाळपोळ केल्याचेही समोर आले आहे.
नक्षलवाद्यांनी बुधवारी भामरागड तालुक्यातील पेनागुंडा येथील एका आदिवासी नागरिकाची हत्या केली होती. तसेच अहेरी तालुक्यातील वनविकास महामंडळाच्या जंगलात बांबू तोडणाऱ्या कामगारांना बेदम मारहाण केली होती. 22 जानेवारीला भामरागड तालुक्यातील कासनासुरच्या 3 आदिवासींची निर्घृण हत्या, त्यानंतर 27 जानेवारीला पुन्हा एटापल्ली तालुक्यातील तारगुडा येथील एका आदिवासी नागरिकाची हत्या केल्याची घटना घडली होती. या घटना ताज्या असतानाच आज पुन्हा नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली आहे.




























































