
विज्ञान… आपले रोजचे जगणे या तीन अक्षरांनी भारलेले आहे.
दर आठवडय़ाला विज्ञान पत्रकार शैलेश माळोदे एका वैज्ञानिकाला आपल्याशी गप्पा मारायला घेऊन येणार आहेत…
84 वर्षांचे तरुण वैज्ञानिक आणि भारतरत्न प्रा. चिंतामणी नागेश रामचंद्र राव अर्थात प्रा. सी. एन. आर. राव यांचं नाव न ऐकलेला रसायनशास्त्राचा विद्यार्थी विरळा असल्याची शक्यता आहे. वैज्ञानिकांचं जग संपूर्णपणे वेगळं असतं, त्याला एक प्रकारचं गुढतेचं ग्लॅमर असतं. प्रा. राव यांच्यासारख्या हिंदुस्थानी विज्ञान क्षेत्रातील ‘भीष्म पितामह’ महान शास्त्रज्ञाला तर ते अधिकच असतं. विज्ञानासारख्या तशा रूक्ष समजल्या गेलेल्या, परंतु वास्तवात रंजक असलेल्या विषयाचं तत्कालिक भान आपल्या सर्वांना असणं आणि या ज्ञानयुगात करीअर्सची नवी उगवती क्षेत्रं त्यामधील ट्रेंड सेटर्सद्वारे खुली होणं नवीन पिढीतील आपणा सर्वांना निश्चितच आवडेल या जाणिवेतून खरं तर हा सर्व लेखन प्रपंच साकारला जाणार आहे. त्यामधील हे पहिलं पुष्प सर्वांत वरिष्ठ शास्त्रज्ञाच्या कर्तृत्वाविषयी.
सध्या प्रा. सी.एन.आर. राव नॅशनल रिसर्च प्रोफेसर आणि बेंगळुरू येथील जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ऍडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च या संस्थेचे मानद अध्यक्ष आणि लिनस पॉली रिसर्च प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. जगातील एक अत्यंत नामवंत सॉलिड स्टेट आणि मटेरियल सायंटिस्ट म्हणून ते ओळखले जातात.
माणूस म्हणून आपल्यातील ऊर्जा आणि पॅशन आपल्याला सतत पुढे पुढे नेत कार्यप्रवण ठेवते असे प्रा. राव आवर्जून सांगतात. तरुण असताना ते विज्ञान संशोधनात फारसे रस घेत नव्हते, पण आता त्यानंतर 30-40 वर्षांनी त्यात अधिकच रुची घेऊ लागले विशेषतः साठीनंतर. वयाची 60 वर्षे उलटल्यावर त्यांचं संशोधन अधिक वेग घेऊ लागले. सत्तरीत तर ते प्रचंड वेगाने पुढे सरकू लागले. आज ते 84 वर्षांचे असूनही त्यांनी वय ही संकल्पना मोडीत काढून संशोधन कार्य पुढे सुरू ठेवत आपलं अनुभवविश्व विस्तारलंय. वयाची 24-25 वर्षे उलटेपर्यंत त्यांच्या नावावर 28 शोध निबंध होते. पीएच.डी. करून ते हिंदुस्थानात परतले होते तेव्हा त्यांना अनेक प्रथितयश विद्यापीठं आपल्या फॅकल्टीवर घेण्यासाठी स्पर्धेत होती पण जेव्हा आयआयएससी, बंगळुरूने त्यांना लेक्चरशिप देऊ केली तेव्हा आईच्या शब्दाखातर ते बंगळुरूला स्वदेशी कायमस्वरूपी परतले.
सर्वसाधारणपणे दर पंधरवडय़ाला एक शोध निबंध असा अफाट वेग त्यांचा राहिला. त्यावर टीकाही होत असे. पण प्रा. सी.एन.आर. म्हणतात माझ्याकडे काम करून सुमारे 160 पेक्षा जास्त मुलामुलींनी डॉक्टरेट मिळवली आहे. बरेच लोक सहायक किंवा पोस्ट डॉक म्हणून मार्गदर्शन घेऊन गेलेत. माझ्या मार्गदर्शनाची पद्धत अशी आहे की, मी दररोज माझ्या विद्यार्थ्यांना भेटतो, त्यांच्या सोबत काम करतो आणि त्यांना वेळ वाया घालवू देत नाही. म्हणून मला चांगले आणि जास्त रिझल्टस् कमी काळात मिळतात आणि म्हणून मी जगाशी स्पर्धा करू शकतो. मला जगातल्या सर्वोत्तम माइंडस्शी स्पर्धा करायची असल्यामुळे, विश्राम करणं परवडत नाही. माझ्या विद्यार्थ्यांनाही मी असंच घडवतो.
हिंदुस्थानमधील नॅनो संशोधनाची सुरुवात त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन केली. आपली संशोधन आणि शिक्षणविषयक आग्रही मतं मांडून त्यांनी काळाबरोबर राहणे पसंत करून तरुणांपुढे एक आदर्श ठेवलाय. फॅरेडे त्यांचे ‘नायक’ही हिरो होत. केवळ तीन वर्षांच्या शालेय शिक्षणाच्या जोरावर ते जगाचे सर्वात महान वैज्ञानिक ठरले असं सांगत राव यांनी त्यांचा एक किस्सा सांगितला जो आज सर्व युवकांसाठी मोठी शिकवणच आहे. एका तरुण माणसाने फॅरेडेंना विचारले, ‘‘मि. फॅरेडे, मला सोप्या शब्दांत विज्ञान म्हणजे काय हे सांगा.’’ फॅरेडे उत्तरले, ‘‘हे गूढ केवळ तीन शब्दांचं आहे. कार्य करा, ते संपवा आणि नंतर प्रकाशित करा.’’ फॅरेडेंची ही त्रिसूत्री प्रा. सी.एन.आर. राव यांची प्रमुख मार्गदर्शक राहिलेली आहे अगदी आजतागायत म्हणूनच ते 84 वर्षांचे सर्वात तरुण हिंदुस्थानी वैज्ञानिक विज्ञान महर्षी आहेत.























































