मालवण आयटीआय गैरव्यवहार प्रकरण; जगन्नाथ कद्रेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी 

मालवण आयटीआय संस्थेला केंद्र सरकारच्यावतीने मिळालेल्या अडीच कोटी बिनव्याजी रक्कमेतील 99 लाख 28 हजार रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या अंधेरी पश्चिम येथील जगन्नाथ महादेव कद्रेकर (70) यांचा जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी हा निर्णय दिला असून सरकारी पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता स्वप्नील सावंत यांनी काम पाहिले.

केंद्र सरकारने देशभरातील 1,365 आयटीआय संस्थाना नवीन अभ्यासक्रम, आवश्यक इमारत, अद्ययावत सुविधा, साहित्य खरेदी आदी दर्जा सुधारण्यासाठी निधी दिला होता. त्यानुसार मालवण आयटीआयला बिनव्याजी व परत करण्याच्या अटीवर अडीच कोटी निधी उपलब्ध झाला होता. मात्र, निधी मालवण आयटीआयला खर्च करण्याचा अधिकार नव्हता. यासाठी सहयोगी संस्था प्रतिनिधी निवड करून त्यांची अध्यक्षपदी, आयटीआयचे प्राध्यापक पदसिद्ध सचिव, एक शासकीय अधिकारी व एक विद्यार्थी अशी समिती नियुक्त करण्यात आली होती. यासाठी अंधेरी येथील निर्माण रिअल्टर अँड डेव्हलपर्स संस्थेचे संचालक जगन्नाथ कद्रेकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.

संशयित कद्रेकर यांनी 28 जानेवारी 2009 ते 31 मे 2012 या कालावधीत 99 लाख 28 हजार रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. कद्रेकर यांनी मनमानी करीत आराखड्यात बदल करीत 89 लाखांची हाऊस बोट व 10 लाखाची स्पीड बोट खरेदी केली. त्याचा प्रस्ताव सचिव यांची स्वाक्षरी न घेता केवळ स्वतःची स्वाक्षरी करून दाखल केला. हे करताना निविदा प्रक्रिया राबविली नाही. याला भारताचे नियंत्रक व महालेखापाल निरीक्षक यांनी आक्षेप घेत चौकशी समिती नियुक्त केली.या चौकशीत ते दोषी आढळले. या कारभाराचे शासकीय दोन व खाजगी एक असे एकूण तीन ऑडिट झाले. त्यातही अनियमितता आढळल्याने वांद्रे मुंबई येथील सहाय्यक संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अजित पोपट शिंदे यांनी 1 डिसेंबर 2018 रोजी तक्रार देत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी भादंवि कलम 420, 406, 465, 467, 471 नुसार कद्रेकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणी आपल्याला अटक होऊ नये यासाठी संशयित जगन्नाथ कद्रेकर यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र, सुनावणीवेळी सरकारी पक्षाने संशयित कद्रेकर यांना निर्माण रिअल्टर अँड डेव्हलपर्स संस्थेने 2009 मध्ये काढून टाकलेले असताना ते मालवण आयटीआयमध्ये अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्यांनी आपल्या नातेवाईकांना यात उद्योग प्रतिनिधी म्हणून घेतले. खोटी कोटेशन सादर केली. स्पीड बोट सात सीटची खरेदी करत असल्याचे कागद दिले. पाच सीटची खरेदी केल्याचे सांगितले. प्रत्येक्षात 4 सीटची स्पीड बोट खरेदी केली. हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी कद्रेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला.