कोपरगावात बंद घराचे कुलप तोडून दोन घरफोड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगाव 

कोपरगाव शहरातील सुभद्रा नगरातील अशोक विभुते व निवाड्यातील अशोक जनार्धन महाजन या दोन्ही बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केल्याचे निदर्शनास आले आहे. विभुते परिवार नासिक तर महाजन परिवार पुणे येथे गेले होते. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास या घरफोड्या झाल्या असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सुभद्रा नगर येथे राहत असणारे अशोक विभूते यांची मुले नासिक येथे नोकरीला असल्याने ते आपल्या मुलांकडे गेले आहेत. तर अशोक महाजन हे आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेले आहेत. या दोन्ही घरांना टाळे असल्याचे पाहून चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री कुलूप तोडून घरात घुसून घरातील सामानाची तसेच कपाट उघडून त्यातील सामानाची उचकापाचक केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घतेली आणि पंचनामा केला. या घटनेची माहिती या कुटुंबांना कळविली असून अशोक विभूते आणि अशोक महाजन आल्यानंतरच घरातील कोणकोणत्या वस्तू आणि कोणत्या मुद्देमालाची चोरी झाली आहे, ते समजेल असे पोलिसांनी सांगितले. सुभद्रा नगर आणि निवारा भागात बऱ्याच पोलीस कर्मचाऱ्यांचे वास्तव्य असतांनाही या भागात चोरीच्या घटना वाढत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

या पूर्वी या भागात पोलीसांची गस्तीची गाडी फिरत होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पोलिसांची गस्त बंद आहे. पोलिसांनी हिवाळा संपेपर्यंत तरी रात्रीची गस्‍त सुरू ठेवावी अशी शहरातील नागरीकांची मागणी आहे. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांची गांभिर्याने दखल घेतील अशी अपेक्षा नगरसेवक जनार्दन कदम यांनी व्‍यक्‍त केली.या मागणीची दखल घेतली नाही तर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा त्‍यांनी दिला.