
सामना प्रतिनिधी । मुंबई
पबजी खेळण्यासाठी महागडा फोन घेऊन दिला नाही म्हणून कुर्ला येथील नदीम शेख या 19 वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी नदीमने किचनमध्ये ओढणीचा फास घेऊन आत्महत्या केली.
कुर्ला पूर्व येथील वर्षा आदर्श सोसायटीत नदीम आई, भाउ, वहिनी आणि बहिणीसोबत राहत होता. नदीम भावाकडे महागडा मोबाईल मागत होता. त्यासाठी त्याला 37 हजार रुपये हवे होते. यावरून गुरुवारी त्याने भावाशी वाद घातला. भावाने त्याला 20 हजार रुपये द्यायची तयारी दर्शवली, पण मला पूर्ण रक्कम हवी आणि तोच मोबाइल हवा असा हट्ट धरीत नदीमने पैसे नाकारले.
आत्महत्या करण्यापूर्वी नदीम पबजी गेम खेळत होता. रात्री 2 वाजता नईम या त्याच्या भावाने त्याला खेळ बंद करून झोपण्यास सांगितले. पहाटे 4 च्या सुमारास त्याचा भाऊ टॉयलेटला जाण्यासाठी उठला असता किचनमधील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने लटकून नदीमने आत्महत्या केल्याचे त्याला दिसले. नदीमच्या भावाने नेहरु नगर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला.




























































