
सामना प्रतिनिधी । नागपूर
रणजी चषक क्रिकेट स्पर्धेतील विदर्भ आणि सौराष्ट्र यांच्यातील फायनलची घमासान आजपासून सुरू झाली. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या विदर्भाने पहिल्या दिवशी 200 धावसंख्येपर्यंत मजल मारली, पण त्यासाठी त्यांना 7 फलंदाज गमवावे लागले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अक्षय कर्णेवार 31 धावांवर खेळत होता, तर अक्षय वाखरे शुन्यावर त्याला साथ देत होता.
विदर्भाच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. धावफलकावर 21 धावा लागलेल्या असताना जयदेव उनाडकटने संजय रघुनाथला (2) वासवदाकरवी झेलबाद करून सौराष्ट्राला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर कर्णधाल फैझ फजलही (16) धावबाद झाला. मग वसीम जाफर (23), मोहित काळे (35), गणेश सतीश (32), अक्षय वाडकर (45) यांनी चांगली फलंदाजी करीत विदर्भाला दोशने धावांपर्यंत पोहोचविले. सौराष्ट्राकडून जयदेव उनाडकटने 2 गडी बाद केले, तर चेतन सकारीया, प्रेरक मंडक, धर्मेंद्रसिंह जाडेजा व कमलेश मकवान यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.


























































