
सामना ऑनलाईन, मुंबई
पोलिटिकल स्ट्रटेजिस्ट अर्थात निवडणूक व्यवस्थापनतज्ञ म्हणून ज्यांची ओळख आहे ते प्रशांत किशोर आज ‘मातोश्री’ निवासस्थानी आले आणि प्रसारमाध्यमांसह राजकीय भुवयाही उंचावल्या. प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते.
2014च्या लोकसभा निवडणुकीत तसेच बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश-लालू यांच्या आघाडीसाठी प्रशांत किशोर यांनी ‘यशस्वी’ व्यवस्थापन सांभाळले. सध्या ते संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष आहेत. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. यावेळी प्रशांत किशोर यांनीही हजेरी लावल्याने या भेटीबाबत पत्रकारांमध्येच नव्हे, तर राजकीय वर्तुळातही कमालीची उत्सुकता होती.
बैठकीनंतर पत्रकारांनी याबाबत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीकडे राजकारण म्हणून बघू नका. एनडीएतील घटक पक्षाचे महत्त्वाचे नेते या नात्याने त्यांनी ‘मातोश्री’वर भेट दिली आणि खासदारांशी गप्पा मारल्या.
आम्ही स्वतःच्या ताकदीवर लढू
युतीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, युतीच्या विषयावर शिवसेना काहीही बोलणार नाही आणि बोलण्याची आवश्यकता नाही. कारण उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना कामाला लागली आहे. शिवसेनेची स्वतःची ताकद आहे. आम्ही ताकदीवर लढू. शिवसेना पक्षप्रमुखांनी पूर्वीच घोषणा केली आहे की आम्ही आमच्या ताकदीवर लढू. युतीच्या चर्चेत आम्ही कधी सहभागी होत नाही. ती चर्चा फक्त प्रसिद्धीमाध्यमे करतात. तुमच्या माध्यमातून या गोष्टी आमच्याकडे येतात असे खासदार राऊत यांनी पत्रकारांना सांगितले.
शिवसेना सदैव मोठा भाऊ
महाराष्ट्रात शिवसेनेने नेहमी मोठय़ा भावाची भूमिका बजावली आहे असे संजय राऊत यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. शिवसेना पुढेही मोठा भाऊच राहील. महाराष्ट्रात तर शिवसेना मोठा भाऊ आहे आणि देशातही मोठा भाऊ आहे, असे ते म्हणाले.
देशाचा पंतप्रधान शिवसेनाच ठरवणार
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे समीकरण उद्धव ठाकरे जुळवत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसेनाच विराजमान होणार आणि महाराष्ट्रातील जनताच शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणार. एवढेच नव्हे तर हिंदुस्थानच्या राजकारणातही शिवसेना महत्त्वाची भूमिका बजावणार असून देशाचा पुढचा पंतप्रधान शिवसेनाच ठरवणार आहे, असे संजय राऊत यांनी ठामपणे सांगितले.
युतीसाठी मध्यस्थीची गरज नाही
शिवसेना नेहमी स्वतःच्या स्ट्रटेजीवर चालते. पूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्ट्रटेजी होती. आता उद्धव ठाकरे यांची आहे. युतीसाठी कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.






























































