स्वच्छंद- नृत्य आमचा श्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्या कुलकर्णी,[email protected]

स्वर्गीय नर्तक. देखणे, चमचमते रुप… पायातील पदन्यास… हे जीवन किती सुंदर आहे… हेच जणू हा चिमुकला पक्षी आपल्याला सांगत असतो… त्याच्या नृत्यातून…

नावाप्रमाणेच स्वर्गीय असा हा पक्षी, बघताक्षणीच आपण त्याच्या प्रेमात पडतो. निसर्गाने या पक्ष्याला रुपेरी पांढरा शुभ्र रंग व लांब डौलदार शेपटी, डोक्यावर काळा-निळा तुरा देऊन सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे. याचे फोटो काढण्याचा मोह कुणाही छायाचित्रकाराला न झाला तरच नवल… मीही त्याला कशी अपवाद असणार? पण योग काही येत नव्हता. अखेर गणेश गुडी व सत्ताल येथे जाऊन ती इच्छा पूर्ण झाली. हा पक्षी अतिशय चंचल आहे. त्यामुळे त्याला कॅमेऱयामध्ये कैद करणे हे एक आव्हान होते. त्याच्या शेपटीची जी विलक्षण मनोवेधक रूपे दिसतात ती पाहून आपण अवाक होतो. दोन डोळय़ांत किती साठवू आणि किती किती त्याचे फोटो काढू असेच जणू होऊन जाते.

हा हिंदुस्थानातील जंगलात आढळणारा पक्षी आहे. मध्य प्रदेश राज्याचा हा ‘राज्य पक्षी’ आहे. मध्य प्रदेशातील बांधवगड राष्ट्रीय उद्यानात स्वर्गीय नर्तक मोठय़ा प्रमाणावर आढळतात. हिंदुस्थानी उपमहाद्वीप, मध्य आशिया व म्यानमार प्रदेशात स्वर्गीय नर्तक या पक्ष्याचे वास्तव्य आहे.

हा पक्षी एखाद्या जलपरीसारखे रूप असलेला, अवर्णनीय तोरा असणारा स्वर्गीय नर्तक आहे. नर रुपेरी पांढऱया रंगाचा, 20-22 सें.मी. आकाराचा असतो. शेपटीवरील मध्यवर्ती पिसांची जोडी लांब फितीसारखी असते. डोके निळे-काळे व चकाकणारे असून त्याच रंगाचा तुरा असतो. मादी व युवा नर तांबूस नारिंगी रंगाचे असून खालील बाजूस राखाडी रंगाचे असतात. त्यांचे डोके व तुरा काळय़ा रंगाचा असतो. मादीची शेपटी आखूड असते. यांना पाहून मला असे म्हणावेसे वाटते, ‘रंगसंगती तुझी देखणी, वाटे असावी अशी पैठणी.’

हे पक्षी स्थलांतरित असून हिवाळय़ामध्ये उष्ण कटिबंधीय आशियामध्ये येतात. दक्षिण हिंदुस्थानात स्थानिक पक्ष्यांचे प्रमाण खूप आहे. त्यामुळे हिवाळय़ात या पक्ष्यांची संख्या खूपच असते. दरवर्षी जून महिन्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात यांची असंख्य घरटी सहज दृष्टीस पडतात. या कालावधीत ते पन्हाळा परिसरात स्थलांतर करून येतात.

bird-final-1

इतक्या सुंदर पक्ष्याचे गाणे व आवाज फारसा गोड नाही, नेहमी अगदी कर्कश्श, खरखरीत आवाजात शीळ घालत असतो. प्रजननाच्या काळात मात्र नर गोड गात असतो. बरेच वेळा हे पक्षी जोडीने उडत असतात. कधीकधी इतर पक्ष्यांच्या बरोबरही दिसतात. नराची लांब शेपटी फर्रर्र-फर्रर्रर्र आवाज करते. नर जेव्हा इकडून तिकडे घिरटय़ा मारत असतो, तेव्हा त्याच्या शेपटीची हालचाल खूपच मोहक दिसते. त्या नृत्य प्रकाराचा अनुभव प्रत्यक्षच घ्यायला हवा. त्यामुळेच कदाचित मादी नराकडे आकृष्ट होत असावी. अतिशय चंचलतेने त्याच्या हालचाली होत असतात.

माश्या, डास, फुलपाखरे, विविध प्रकारचे किडे हे त्यांचे मुख्य खाद्य. बरेच वेळा उडत असतानाच ते भक्ष्य पकडतात. त्यांचा अंडी घालण्याचा ऋतू मे ते जुलै पावसाळय़ाच्या पूर्वार्धात असतो. जमिनीपासून 2 ते 5 मीटर उंचीपर्यंत हे पक्षी घरटे बांधतात. ते वाटीच्या आकाराचे असते, कोळिष्टकांनी गुंफलेल्या पातळ गवताच्या पाती व धागे वापरून अतिशय सुबक घरटे बांधतात. घरटय़ांना बाहेरून कोळिष्टके व अंडीकोश चिकटवलेले असतात. घरटे झाडाच्या फांदीवर असते. बहुतेक वेळा कोतवाल पक्ष्याच्या घरटय़ाजवळच आपले घरटे सुरक्षेसाठी बांधतात. फिक्कट गुलाबी रंगावर तांबूस तपकिरी ठिपके व चट्टे असलेली 3 किंवा 5 अंडी हे पक्षी घालतात. नर व मादी दोघे मिळून अंडी उबवण्याचे व नंतर पिल्लांना खाऊ घालण्याचे काम करतात. 14-16 दिवस अंडी उबवण्यासाठी व 9 ते 12 दिवस घरटय़ामध्ये सांभाळण्यासाठी लागतात. साधारण 21 ते 23 दिवसांत पिले बाहेर उडू लागतात. कधी कधी चष्मेवाला (ओरियंटल व्हाईट आय) व स्वर्गीय नर्तक एकमेकांच्या पिल्लांना सांभाळताना आढळतात. या पक्ष्याचे सौंदर्य माझ्या कॅमेऱयात टिपण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला प्रत्यक्षाची अनुभूती देण्याचा माझा प्रयास आहे.