स्टार्क हिंदुस्थानी दौऱ्याला मुकणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मेलबर्न

हिंदुस्थानच्या खडतर दौऱ्यावर येण्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला मोठा धक्का बसलाय. स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे कांगारूंचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क संघाबाहेर गेला आहे. श्रीलंकेकिरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात 10 बळी घेत स्टार्कने ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. मात्र याच सामन्यादरम्यान त्याच्या स्नायूंवर ताण आल्याने तो 24 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या हिंदुस्थान दौऱ्याला मुकणार आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संघनिवड समितीचे प्रमुख ट्रेवर होन्स यांनी ही माहिती दिली. हिंदुस्थान दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा संघ दोन टी-20 आणि पाच वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. घरच्या मैदानावर खेळत असताना ऑस्ट्रेलियाला हिंदुस्थानकडून कसोटी आणि वन डे अशा दोन्ही मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता. केवळ टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती. मिचेल स्टार्कसह अष्टपैलू मिशेल मार्श, जोश हेजलवूड, पीटर सिडल हे ऑस्ट्रेलियाचे अनुभवी खेळाडूही हिंदुस्थानच्या दौऱ्यावर नाहीत.