
सामना प्रतिनिधी । कल्याण
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सहा महिन्यांत घ्या, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात दिले होते. मात्र पाच महिने झोपा काढण्यातच धन्यता मानलेल्या जिल्हा प्रशासनाला मुदत संपता संपता जाग आली असून केवळ मतदार यादीच प्रसिद्ध केली आहे. आता येत्या 20 दिवसांत निवडणूक घेण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे. असे नाही झाले तर न्यायालयाच्या अवमानाला जिल्हाधिकारी, जिल्हा निबंधक यांना सामोरे जावे लागणार आहे.
बाजार समितीवर भाजपची सत्ता असताना बेबंद कारभार झाला. केवळ सत्ता टिकवण्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पणन महामंडळ आणि सहकार विभागाकडून तीन वेळा प्रत्येकी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळवली. मात्र भाजपच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध शेतकरी आणि व्यापाऱयांनी सातत्याने आवाज उठवला. त्यामुळे पणन विभागाने अखेर संचालक मंडळ बरखास्त केले आणि जिल्हा उपनिबंधक शहाजी पाटील यांची प्रशासक म्हणून शासनाने नियुक्ती केली. गेले वर्षभर पालिकेवर प्रशासक आहे. मात्र लोकशाहीविरोधी कृत्ये काही भाजपने कमी केली नाहीत. पुन्हा सत्ता मिळणार नाही याची खात्री असल्याने बाजार समितीची निवडणूक कशी लांबणीवर पडेल यातच भाजपने धन्यता मानली. अखेर कल्याणच्या गुरवली सेवा संस्थेचे उपाध्यक्ष अरुण जाधव यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
… तर अवमान याचिका दाखल
न्यायालयाच्या आदेशानुसार फेब्रुवारी अखेर निवडणूक घ्यावीच लागणार आहे. 18 हजार सातशे सभासद मतदानासाठी पात्र आहेत. न्यायालयाचा आदेश मानला नाही तर जिल्हाधिकारी आणि जिल्हा निबंधक यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसल्याचे अरुण पाटील आणि कपिल थळे यांनी सांगितले.
भाजपला नाराजी भोवणार
नव्या नियमानुसार सात बारा उतारा असणारा शेतकरीच बाजार समितीचा सभासद होण्यास पात्र आहे. भाजपच्या नेत्यांनी सत्ता असताना मोठय़ा प्रमाणात बोगस सभासद करून घेतले होते. मात्र शिवसेनेने आक्षेप घेतल्यानंतर जवळपास बाराशे सभासद रद्द झाले. गेल्या चार वर्षांत व्यापारी, माथाडी आणि शेतकरी यांच्याविरोधात कारभार केल्यामुळे भाजपला येत्या निवडणुकीत या सर्वांची नाराजी भोवणार असल्याची चर्चा आहे.
- बाजार समितीची निवडणूक मुद्दामहून लांबणीवर टाकली जात असल्याचा त्यांनी मुद्दा मांडला. जाधव यांचे म्हणणे न्यायालयाने ग्राह्य धरले. लोकशाही पद्धतीने सहा महिन्यांत बाजार समितीची निवडणूक घेण्याबाबत 24 ऑगस्ट 2018 रोजी न्यायालयाने ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निबंधक यांना बजावले.
- फेब्रुवारी 2019 च्या आत निवडणूक घेणे आवश्यक असताना जानेवारापर्यंत जिल्हा प्रशासनाने काहीच हालचाल केली नाही. मुदत संपत आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि मतदार यादी प्रसिद्ध कार्यक्रम राबवला.
- मतदार यादीवर कुणी आक्षेप घेतला नसल्याने प्रशासनाने सुस्कारा सोडला आहे. मात्र फेब्रुवारी संपायला अवघे 20 दिवस उरले आहेत.




























































