
सामना प्रतिनिधी । कुडाळ
वाहन चालवताना आपल्या बरोबर दुसऱ्यांच्या जीवाला जपा. अपघाताची शक्यता लक्षात घेऊन सावधतेने वाहन चालवा. रस्त्यावर वाहतूक निर्देशित चिन्हांचा अर्थ समजून घ्या आणि वाहन चालवा. म्हणजे अपघातांची शक्यता कमी होते. वाहतूक विषयक नियमानुसार वाहन चालविले तर ७५% अपघातांचे प्रमाण कमी होईल व आनंदी जीवनाचा आनंद घेता येईल, असे उद्गार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्गचे अशोक शिंदे यांनी काढले.
कुडाळ एमआयडीसी येथील बॅ.नाथ पै शिक्षणसंस्थेच्या नर्सिंग कॉलेज व महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘रस्ता सुरक्षा ‘ या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. आपल्या मार्गदर्शनपर मनोगतामध्ये मा.शिंदे यांनी विविध वाहतूक विषयक वाहन चालवितानाच्या दिशादर्शक चिन्हांचा अर्थ व सूचनांचा उपस्थितांना परिचय करून दिला. व लायसन्सशिवाय, हेल्मेटशिवाय वाहन न चालविण्याचा सल्ला देत ऑनलाईन वाहन परवाना मिळवा, असे सांगत वाहन चालविताना कोणती खबरदारी व सुरक्षितता बाळगावी याचे पॉवर पोइंट प्रेझेंटेशन मार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर महिला महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य अरुण मर्गज, व्यवस्थापकीय अधिकारी मिनल ठाकूर,हिशेब कार्यकारी अधिकारी अमृता गाळवणकर, मोटारवाहन निरीक्षक सागर भोसले उपस्थित होते. यावेळी प्रा.दीपेश गावडे,प्रा.परेश धावडे,प्रा.तृप्ती नाईक,प्रा.मनाली मुळीक,प्रसाद कानडे इ.सहित महिला महाविद्यालयाच्या व नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. प्रास्ताविक व आभार अरुण मर्गज यांनी केले.































































