
>> डॉ. राजेंद्र बर्वे
सध्या ‘पबजी’ या गेमने मुलांना वेड लावलं आहे. काही दिवसांपूर्वी याआधी पोकेमॉन गो, ब्लू व्हेल यांसारख्या गेम्सनी मुलांना वेड लावलं होतं. त्यात आता पबजीची भर पडली आहे. आकर्षक व्हिज्युअल्स आणि अॅक्शनमुळे हा गेम सध्या तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला आहे. या गेमसाठी अठरा वर्षे ही अट असली तरी त्यापेक्षा कमी वयाची मुलंही हा गेम खेळत असतात, ज्याचा परिणाम मुलांच्या मानसिक स्वास्थ्यावर होत असल्याचे निदर्शनास आलं आहे. याबाबत ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी याबाबत मांडलेले विश्लेषण.
सध्या पबजी खेळाची क्रेज खूप वाढत चालली आहे तरुण मुलं या खेळाच्या आहारी पडताना दिसत आहेत. शाळा, कॉलेज शिकण्याच्या वयात असे ऑनलाइन खेळ खेळून आपला वेळ वाया घालवत आहे. व्हिडीओ गेम्सची तरुणाईला पडलेली भुरळ नवीन नाही. सध्या ‘पबजी’ नावाच्या गेमनं धुमाकूळ घातला आहे. हा ऍक्शनपॅक्ड गेम खेळणाऱया तरुण मुलांचं प्रमाण वाढतं आहे. या गेममुळे मुलांच्या मनावर मात्र विपरीत परिणाम होत आहे. मुलांचे मानसिक संतुंलन बिघडत चालले आहे.
हा खूप मोठा आणि व्यापक प्रश्न आहे. सध्या मुलांना सहजपणे मोबाईल हातात मिळतो. त्यातल्या अनेक गोष्टी ते सहजपणे शिकतात आणि फ्री डेटामुळे कितीही डेटा डाऊनलोड करता येतो. ही मोबाईल गेमसाठी पूरक गोष्ट ठरते. त्यामुळे केवळ मुलंच नव्हे, तर मोठय़ा समजूतदार व्यक्तींच्या हातात मोबाईल आला तरी ते गेम किंवा अन्य सोशल नेटवर्किंग साइटवर वेळ घालवतात. यात कोणत्याही गेमला सध्या आपल्याकडे मनाई नाहीये. त्यामुळे धोका अधिक वाढला आहे. गेम ही अशी गोष्ट आहे, जी सगळ्यांना आकर्षित करते. याला कारण आहे ते या गेमचं स्वरूप. गेम म्हटलं की त्यात स्पर्धा आलीच. त्यामुळे गेम खेळताना आपसूकच आव्हान स्वीकारल्याची भावना तयार होते.
अशा प्रकारे आव्हान स्वीकारून खेळ खेळण्याचं व्यसन आपल्याकडे जुनंच आहे. यात इतर बरेच खेळ येतात. जसं लाखो रुपये खर्च करून लोक क्रिकेट बघायला जातात. एखाद्या देवळाच्या भोवती कायम गर्दी दिसून येते. अशा काही गोष्टींची लोकप्रियता अचानक का वाढते, तर याचं कारण म्हणजे त्यांचा प्रभाव जाणवणं आणि तो विस्तारित होणं. तुमचं मन, मेंदू डोळे अशा खेळांमध्ये गुंतून जातात. त्यामुळे यात अडकलं जाणं स्वाभाविक ठरतं. यात तन, मन, धन खर्च करून लक्ष केंद्रित केलं जातं. अशा प्रभावी माध्यमांचे आपण गुलाम होतो आणि तेही स्वेच्छेने. विशेष म्हणजे, आपण अडकलो आहोत, या व्यसनाचे गुलाम झालो आहोत हेही यात मान्य केलं जात नाही. ही एक प्रकारची भावनिक, मानसिक आणि बौद्धिक गुलामगिरी असते.
विशेषतः लहान मुलं यात अधिक रमतात याचं कारण त्यांच्याकडे असणारी अतिरिक्त ऊर्जा. मोबाईल वा व्हिडीओच्या व्यसनापासून मुक्ती देणारं पहिलं केंद्र चीनमध्ये 2008 साली स्थापन करण्यात आलं. यावरूनच चीनच्या बीजिंगमध्ये याची दाहकता किती तत्परतेने स्वीकारली आहे हे लक्षात येते. यातील चीनची पद्धत चुकीची असली तरी त्यांनी याबाबत एक पाऊल पुढे टाकलं. या घटनेलाही आता 10 वर्षांचा काळ सरला आहे आणि आपल्याकडे याबाबत केवळ चर्चा घडत आहेत याचा विषाद वाटतो. म्हणूनच यातून आपल्या मुलांची सुटका होण्यासाठी आपणच पुढे यायला हवं. शाळा, पालक, मनोविकारतज्ञ आणि व्यसनमुक्ती संघटना यांनी यासाठी पुढे यायला हवं.
मोबाईल गेम, सोशल नेटवर्किंग साइट्स या गोष्टींनी आपल्या वेळेचा, झोपेचा ताबा घेतला आहे. हे गेम खेळण्यासाठी मोठय़ा व्यक्ती आपली झोपेची, आरामाची वेळ पणाला लावतात. याचा परिणाम त्यांचं करीअर, मेहनत घेण्याची क्षमता यावर जाणवतो. सतत एका जागी बसून राहिल्याने, हालचालींवर मर्यादा आल्याने वजन वाढतं. आरोग्यावर परिणाम होतो. आक्रमकता वाढल्याने जंकफूड खाण्याचं प्रमाणही वाढतं. यामुळे शारीरिक समस्यांचं प्रमाणही वाढलं आहे.
मोबाईल गेममुळे आक्रमकता वाढली आहे असं म्हटलं जातं. खरं तर याआधीही आपण जे बालसाहित्य वाचलं वा मुलं जे वाचतात त्यातही ही आक्रमकता काही अंशी असतेच; परंतु त्यात एक व्यक्ती दुसऱया व्यक्तीला इजा करत असते. इथे मात्र स्वत: मुलंच या भूमिकेत असतात. त्यामुळे ही वृत्ती किती वाढत असेल याची आपल्याला येते. हळूहळू याचा परिणाम जास्त काळ जाणवू लागतो आणि याचं पर्यावसन मानसिक आरोग्य बिघडण्यात होतं. संवेदनशीलता हरवण्यात होतं. गेममध्ये असलेल्या मारधाडीचं अनुकरण खऱया आयुष्यातही करण्याची मानसिकता मुलांमध्ये तयार होते. हा गेम खेळण्याला वयोमर्यादा असली, तरीही ती पाळली जात नाही. गेम खेळताना कुठे थांबावं याचं भान नसतं. अशा खेळांचे मुलांच्या मनावर गंभीर परिणाम होत असतात. या खेळांचा प्रभाव असाच वाढता राहिला तर पुढची पिढी भावनाहीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हा फार मोठा धोका आहे. अशा खेळांनी एका पिढीचं वर्तमान तर बिघडत आहेच, परंतु त्यांचं भविष्यही बिघडत आहे. याला उपाय आहे तो मानसिक संतुलन राखण्याचा. यात मुलांना व स्वत:लाही वर्तमानात जगायला शिकवणं, त्यांना अशा गेमपासून दूर ठेवण्यासाठी त्यांची मानसिक शक्ती वाढवणं यांसारखे उपाय आपण करायला हवेत. यात महत्त्वाचा उपाय ठरतो तो त्यांना संस्कारक्षम जगणं शिकवण्याचा. मुलांना करुणा, त्याग, प्रेम, आपुलकी, भूतदया या जीवनमूल्यांची लहान असल्यापासूनच जाणीव करून दिली, आपल्या वागण्या-बोलण्यातून त्यांना या गोष्टी शिकवल्या तर मुलं अशा गेमच्या आहारी जाणार नाहीत आणि जात असल्यास त्यांना वास्तव जगात आणणं सुलभ होईल.
अशा प्रयत्नांची सुरुवात जशी घरापासून झाली पाहिजे तशीच ती शाळांमध्येही झाली पाहिजे. कारण मुलं दिवसातला बराचसा वेळ शाळेत असतात. तिथे त्यांना या गोष्टी शिकवणं सहजसोपं असतं. केवळ सोशल नेटवर्किंगवर बंदी आणणं, इंटरनेटच्या वापरावर बंदी आणणं हे तात्पुरते उपाय आहेत. त्यावर सरसकट बंदी आणणं शक्यही नाही. मुलांमध्ये मुळापासून ही जाणीव करून दिल्यास त्यांचं पाऊल योग्य दिशेला पडतं. नुकतंच एका 11 वर्षांच्या मुलाने पबजी खेळाविरोधात याचिका दाखल केली हे अतिशय स्तुत्य पाऊल आहे. याचा अर्थ मुलांना चांगलं आणि वाईट यातला फरक ओळखता येतो. पालकांनी त्यांना योग्य वाटेवर नेणं गरजेचं आहे, तरच अशा मोबाईल गेमपासून मुक्ती मिळवत आपलं सामाजिक, कौटुंबिक, मानसिक, शारीरिक आरोग्य सुदृढ राखता येईल.





























































