
सामना प्रतिनिधी । मुंबई
तापणे, भडकणे हा जणू मुंबई आणि मुंबईकरांचा स्थायीभाव असावा. कारण मॉर्निंग वॉकपासून ते रात्री व्हॉटस्ऍपवर गुडनाइटचा मेसेज पाठवेपर्यंत दिवसभरात कुठे ना कुठे मुंबईकर संतापलेलाच असतो. कधी ट्रेनमध्ये धक्का लागला तर कधी टॅक्सी-रिक्षावाला नडला म्हणून. गेल्या दोन दिवसांत मात्र मुंबई आणि मुंबईकर कमालीचा थंड झाला आहे. लोकलमध्ये विंडो सीटसाठी तो मारामारी करत नाही. शिवाय रिक्षातही अंग चोरूनच बसतो. ही सगळी किमया आहे तापमानातील घसरलेल्या पाऱ्याची.
मुंबईत थंडी अशी नसतेच. थंडीच्या मोसमात एकदोन दिवस असतो तो फक्त गारवा. यंदा मात्र कमालच झाली. मुंबईत चक्क थंडीने एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल महिनाभर मुक्काम ठोकला आहे. मुंबईत अशी थंडी घुसल्याने काय झाले, तर बस-ट्रेनच्या खिडक्या बंद झाल्या. कपाटातील जॅकेट बाहेर आले. संध्याकाळी शेकोटय़ा पेटू लागल्या आणि चहावाल्याकडे गर्दी वाढू लागली.
जम्मू-कश्मीरमध्ये बर्फवृष्टी झाली की त्याचा थोडाफार परिणाम मुंबईत जाणवतो. उत्तरेकडून येणारे थंड वारे मुंबईवरच्या आकाशात आहेत. देशाच्या वायव्य भागात हवेच्या दाबात कमालीचा फरक पडल्याने उत्तर आणि मध्य हिंदुस्थानात थंडीची लाट पसरली आहे, असे कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक के. एस. होशाळीकर यांनी सांगितले.
महाबळेश्वरमधील वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरात ठिकठिकाणी दवबिंदू गोठून हिमकण मोठय़ा प्रमाणात तयार झाले. तर याच परिसरात स्ट्रॉबेरीसह फळे, पालेभाज्या, झाडेझुडपे, वेली यांनी हिमकणांची शाल पांघरल्यामुळे त्याची मौज निसर्गप्रेमींना मुक्तपणे लुटता आली.
नाशकातील उगावमध्ये पारा शून्यावर
निफाड तालुक्यातील उगावमध्ये दुसऱ्यादा पारा थेट शून्य अंशावर घसरला. कळवणजवळील मानूर येथे 1.5, निफाडच्या शिरवाडे वणीत 2, कुंदेवाडीत 3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. निफाड, कळवण, दिंडोरी तालुक्यात पहाटेच्या सुमारास दवबिंदू गोठले होते.
राज्यातील तापमान
संभाजीनगर – 6.1
जालना – 7.8
परभणी – 11
नांदेड – 9.5
हिंगोली – 11.2
बीड – 9.0
लातूर – 9.8
धाराशीव – 8.0
पुणे – 5.1
नगर – 6.1
जळगाव – 8.0
बुलढाणा – 9.2
नाशिक – 4.0

























































