
सामना प्रतिनिधी। ठाणे
दिवसभर नाक गळवणारी सर्दी तर रात्री ‘नाका’बंदी आणि अंग मोडून काढणाऱया खोकल्याने अख्खे ठाणे बेजार झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून थंडीने कमबॅक केल्यामुळे ठाणेकरांना हुडहुडी भरली असून शहरात सर्दी-खोकल्याची साथ पसरली आहे. वातावरणातील गारठा आणि थंड हवेत मोठय़ा प्रमाणात साठून राहणाऱया धुलीकणांमुळे ठाण्यात व्हायरल पसरत असून अनेकांनी सर्दी-तापाने बिछाना धरला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून गायब झालेल्या थंडीने दोन दिवसांआधी कडाक्यात कमबॅक केले. त्यामुळे ठाण्याचा पारा अचानक 15 डिग्रीवर उतरला आहे. मात्र वातावरणातील गारठा हुडहुडीबरोबरच सर्दी-खोकलाही देत असल्याचे दिसत आहे. ठाणेकरांचे नाक सर्दीने जाम झाले आहे, तर दुसरीकडे खोकल्याने छातीत घर केले आहे. त्यामुळे रुग्णालये आणि खासगी दवाखाने रुग्णांनी हाऊसफुल्ल होत झाले आहेत. दवाखान्यात येणारा प्रत्येक चौथा रुग्ण सर्दी-खोकल्याचा आढळून येत आहे. त्यात लहानग्यांपासून आजी-आजोबांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे.
ठाण्यात सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. रुग्णालयात येणारा प्रत्येक चौथा रुग्ण हा सर्दी-खोकल्याने हैराण आहे. अनेकांच्या छातीत इन्फेक्शन आहे. वातावरणातील गारवा आणि त्यात मोठय़ा प्रमाणात अडकून बसणारे धुलीकण हे यामागचे कारण आहे.
थंडीत सर्दी-खोकला बळावतो हे आता सामान्य झाले आहे, पण खरा धोका आहे तो हार्ट पेशंटना. खोकल्यामुळे किंवा सर्दीमुळे सतत शिंका येत असल्यास त्याचा ताण हृदयावर पडू शकतो. अशावेळी हार्ट अटॅकची शक्यता वाढते. असे – डॉ. राहुल बापट (एम.डी) यांनी सांगितले आहे.
काळजी घ्या, स्वेटर घाला!
व्यायामाचा अभाव, असंतुलीत आहार यामुळे आजारी पडणाऱयांची संख्या वाढत आहे. रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यामुळे संसर्गाशी लढा देणाऱया पेशी कमजोर पडतात. त्यामुळेच सर्दी- खोकला बळावतो. हे दोन्ही आजार संसर्गजन्य असून गर्दीच्या ठिकाणी किंवा एकमेकांच्या संपर्कात येताच तो पसरतो. थंडीचा जोर वाढला आहे. या वातावरणात सर्दी-खोकला हा लवकर बरा होत नसतो. त्यामुळे योग्यवेळी उपचारांबरोबर रुग्णांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ‘गरम पाणी आणि गरम कपडे’ हा साधासोपा उपाय सर्दी-खोकल्याला दूर ठेवण्यास रामबाण ठरू शकतो.
























































