
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
रिलायन्सचे अनिल अंबानी हे राफेल करारापूर्वी फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांना भेटल्याचा उल्लेख असलेल्या ई-मेलची प्रत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत सादर केली. राफेल करार होणार याची माहिती अंबानींना 10 दिवस आधीच कशी होती? ‘राफेल’चे कंत्राट आपल्यालाच मिळेल, असे अंबानींना कसे कळले? असे सवाल राहुल गांधींनी केले आहेत.
एका एअर बस कंपनीच्या अधिकाऱयाने लिहिलेल्या ई-मेलची प्रत असल्याचे सांगून राहुल गांधी म्हणाले, देशाच्या सर्वांत मोठय़ा संरक्षण कराराची माहिती तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना अजिबात माहीत नव्हती. पण अंबानींना कशी माहिती होती? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोपनीयतेचा भंग करून राष्ट्रीय सुरक्षेची तडजोड केली आहे. पंतप्रधान मोदी हे अंबानी यांचे ‘मिडल मॅन’ म्हणून काम करीत होते. मोदी हे भ्रष्ट व्यक्ती असून त्यांना तुरुंगात डांबले पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले. या वेळी त्यांनी ‘कॅग’वरही ताशेरे ओढले. ‘कॅग’चा अहवाल अर्थहीन आहे. ‘कॅग’ म्हणजे चौकीदार ऑडिटर जनरल अशी खिल्ली उडवली.
रिलायन्स डिफेन्सचा खुलासा
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्सने खुलासा केला आहे. राहुल गांधींनी ज्या ई-मेलचा उल्लेख केला ते एअर बस हेलिकॉप्टरसाठी सहकार्य करण्यासाठी आहे. त्याचा ‘राफेल’ कराराशी काहीही संबंध नाही. तसेच राफेल कराराबाबत हिंदुस्थान आणि फ्रान्समध्ये 25 जानेवारी 2016ला स्वाक्षरी झाली, एप्रिल 2015मध्ये नाही, असे रिलायन्सच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.


























































