
सामना प्रतिनिधी । मुखेड
बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने एका ऑटोचालकाच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी दिनांक १४ रोजी घडली. याबाबत त्या ऑटो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुखेड शहरात शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील व शहरातील अनेक विद्यर्थिनी वास्तव्यास आहेत. मात्र याच शाळा, महाविद्यालय, खासगी शिक्षण शिकवणी परिसरात मोठ्या प्रमाणावर मवाली युवकांचा वावर पाहावयास मिळतो. याकडे संबंधित पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. मुखेड शहरातील महाजन पेठ गल्लीत राहणारी कु.ऐश्वर्या दत्तात्रय पेडगुलवार (१८) ही विद्यार्थिनी बारावी वर्गात शिक्षण घेत होती. ती कॉलेजला जात येत असताना एक मवाली ऑटोचालक तिचा पिच्छा करून तिची छेड काढत होता.
याबाबत त्या युवतीने वेळोवेळी विरोध केला व त्या युवकास समजाविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या ऑटोचालकांनी त्या युवतीचा पिच्छा सुरूच ठेवून माझ्यासोबत लग्न कर, असा तगादा लावला. या छळाला कंटाळून कु. ऐश्वर्या हिने आपल्या राहत्या घरी दिनांक १३ रोज बुधवारी रात्री विषारी औषध प्राशन केले. घरच्या मंडळीना हि बाब कळताच त्यांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात हलविले असता प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा आज दि. १४ रोज गुरुवार मृत्यू झाला. याबाबत त्या मवाली ऑटोचालकाविरुद्ध कलम ३०६, ५०६ भा.द.वी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































