जागृत देशभक्त घडविण्यासाठी डोंगरी पोलिसांचे अतुलनीय काम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

लहान वयातच मुलांमध्ये देशभक्तीची भावना व पोलिसांप्रति सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि त्यातूनच भावी पिढी प्रखर देशभक्त घडावी यासाठी डोंगरी पोलिसांनी कंबर कसली आहे. मुलांना चांगले नागरिक बनविण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकताच अनाथालयातील मुलांना ‘उरी’ हा चित्रपट दाखविण्यात आला.

कम्युनिटी पोलिसिंगचा भाग म्हणून डोंगरी पोलिसांनी विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. पोलिसांनी 8 ते 14 वयोगटातील मुला-मुलींमध्ये देशभावना निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून डोंगरीतील आशा सदन आणि आशा किरण या संस्थेतील जवळपास 180 मुलांना नुकताच डोंगरीतील प्रीमियर गोल्ड या चित्रपटगृहात ‘उरी’ हा चित्रपट दाखविण्यात आला. त्यात काही अनाथ तर काही हरविलेल्या मुला-मुलींचा समावेश होता. हा चित्रपट पाहिल्यानंतर मुलांमध्ये हिंदुस्थानी लष्कर व पोलिसांप्रति अभिमानाची भावना निर्माण झाल्याचे दिसून आले. भविष्यात आपणही चांगले काम करून देशांचे नाव उज्ज्वल करायचे, पोलीस किंवा लष्करात दाखल होऊन अपप्रवृत्तीचा नायनाट करायचा अशी प्रतिक्रिया मुलांनी चित्रपट पाहून झाल्यानंतर दिल्या. मुलांमधील सकारात्मक विचार पाहून पोलिसांचाही हुरूप वाढला आहे. यापुढे असे कार्यक्रम नियमित राबवण्यात येतील व चांगली पिढी घडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे डोंगरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले.

शाळा, महाविद्यालय किंवा अनाथालयात जाऊन आपण मार्गदर्शन करतो. पण नाटक, चित्रपटाच्या माध्यमातून मुलांवर आणखी जास्त चांगल्या प्रकारे प्रभाव टाकता येऊ शकतो. लहान वयातच लष्कर, पोलिसांप्रति मुलांमध्ये वाईट विचार रुजू नये. उलट त्यांच्यात सकारात्मक विचार निर्माण व्हावे हाच ‘उरी’ चित्रपट दाखविण्याचा आमचा हेतू असल्याचे धर्माधिकारी म्हणाले.