मसुरेत बीएसएनएल अधिकाऱ्यांना ग्रामस्थांचा घेराव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मालवण

मसुरे येथील बीएसएनएल टॉवर वारंवार नादुरुस्त होत असल्याने सतत सेवा बंद मुळे त्रस्त ग्रामस्थानी बीएसएनएल कार्यालवर धडक दिली.

दरम्यान, ग्रामस्थांच्या आंदोलनाची दखल घेत मालवण येथील वरिष्ठ तंत्रज्ञ एच.एम. ढवळे मसुरे येथे दाखल झाले. नादुरुस्त टॉवर दुरुस्ती तसेच ग्राहकांच्या तक्रारी लवकरात लवकर दूर केल्या जातील असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

मागील सहा महिन्या पासून मसुरे टॉवर वारंवार नादुरुस्त होत आहे. मध्येच रेंज जाणे, टु जी व थ्री जी सेवा न मिळणे, ब्रॉड ब्रँड सेवेत वारंवार बिघाड होणे आदि समस्यांचा ग्राहकाना सामना करावा लागत आहे. याबाबत मसुरे कार्यालयात ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यातच कनेक्टीव्हीटी अभावी बँक, पोष्ट, रेशनिंग दुकान, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आदि कार्यालयातील सर्व सेवा ठप्प होत असल्याने दुरवरुन येणाऱ्या ग्राहकाना नाहक मनस्ताप होत आहे. मागील संपुर्ण आठवड्यात केवळ काही तासच रेंज होती.

याबाबत माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, माजी उप सभापती छोटू ठाकुर, डॉ. विश्वास साठे, समाजसेवक शिवाजी परब, राहुल परब, यासीन सैय्यद, गणेश मुणगेकर, विरेश येसजी, प्रमोद चव्हाण, जगदीश चव्हाण, बिलाल शेख, अनंत भोगले, खलील चिस्ती, सचिन पाटकर, उमेश बिलये, प्रणित बिलये, रमण पेडणेकर, किरण पाटील, अवधुत चव्हाण, निळकंठ शिरसाठ आदिंसह मसुरे ग्रामस्थानी कार्यालयात येत अधिकाऱ्यांना घेराव घातला.

मालवण येथील ठवळे यानी ग्रामस्थांच्या आंदोलनाची दखल घेत ताबडतोब मसुरे कार्यालयात येत समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले. येथील नादुरुस्त झालेली मशनरी बदलण्यात येणार असून टॉवरच्या सेवेत सातत्य ठेवण्यात येईल असे आश्वासन दिल्याने ग्रामस्थानी आंदोलन मागे घेतले. दरम्यान यासेवेत पुन्हा बिघाड झाल्यास कोणतीही पुर्व सूचना न देता तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा ग्रामस्थांच्या वतीने शिवाजी परब यानी दिला आहे.