बनावट विमा रॅकेटप्रकरणी आणखी एकाला अटक, अंधेरी आरटीओमधून चोरायचा डेटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

बनावट विमा रॅकेट प्रकरणातील आणखी एकाला गुन्हे प्रकटीकरण कक्ष 3 ने अटक केली. धनाजी दाजी पाटील असे त्याचे नाव आहे. तो अंधेरीच्या आरटीओमधील कॅण्टीनमध्ये काम करायचा. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

गुन्हे प्रकटीकरण कक्ष 3 ने जानेवारी महिन्यात बनावट विमा रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पोलिसांनी कारवाई करून प्रशांत सुतार, इनायत बेद्रेकर, गजानन पाटील यांना अटक केली होती. त्या तिघांनी मिळून गेल्या चार वर्षांत 800 मोटारसायकलींचा बोगस विमा उतरवला होता. तिघांच्या चौकशीत धनाजी पाटीलचे नाव समोर आले होते. पोलिसांनी त्याला शनिवारी अटक केली. धनाजी हा मूळचा कोल्हापूरचा रहिवासी असून तो अंधेरी आरटीओमधील कॅण्टीनमध्ये कामाला होता. सुतार हा पूर्वी एका इन्शुरन्स कंपनीमध्ये कामाला होता. त्यामुळे सुतार हा पाटीलला ओळखायचा.

मोटारसायकलच्या विम्याच्या डेटाच्या मोबदल्यात पैसे देऊ असे आमिष सुतारने पाटीलला दिले होते. त्यानुसार पाटील हा स्टोअर रूममध्ये जायचा. तेथून इन्शुरन्स पॉलिसीचे शेवटचे पान चोरत असायचा असा त्याच्यावर आरोप आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणाने युनिट 3 मध्ये धाव घेऊन काही माहिती पोलिसांना दिली होती. एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर युनिट 3 ने कारवाई करून बनावट विमा रॅकेटचा पर्दाफाश केला होता.