हिंदुस्थानची हनुमानउडी- पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेचे जेतेपद पटकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mallakhamb-win

सामना प्रतिनिधी । मुंबई

जागतिक मल्लखांब महासंघाच्या विद्यमाने आणि हिंदुस्थानी मल्लखांब महासंघ तसेच महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना यांच्या वतीने पार पडलेल्या मुंबईमधील श्री समर्थ व्यायाम मंदिर आयोजित जागतिक मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धेत संपूर्ण विश्वात मल्लखांबाचा प्रसार करणाऱ्या हिंदुस्थानच्या महिला संघाने सांघिक विजेतेपद पटकावले.

यजमान हिंदुस्थानने 244.73 गुण मिळवून विजेतेपदावर आपले नाव कोरले. तर 44.45 गुण मिळवून सिंगापूरने आणि 30.22 गुण मिळवून मलेशियाने अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेमध्ये 15 देशांच्या जवळपास 150 हून अधिक मल्लखांबपटूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धा बघण्यासाठी देशभरातील विविध राज्यांमधून हजारो आजी-माजी मल्लखांबपटूंनी हजेरी लावली होती.

दोन दिवस चाललेल्या पहिल्या जागतिक मल्लखांब अजिंक्यपद स्पर्धेची सांगता आणि पारितोषिक वितरण रविवारी शिवाजी पार्कच्या प्रांगणात मोठय़ा दिमाखात पार पडले. हिंदुस्थानात आयोजित या पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेमध्ये यजमान हिंदुस्थानसह जगभरातील इराण, मलेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम, जपान, इंग्लंड, नॉर्वे, बाहरीन, फ्रान्स, इटली, स्पेन, झेक प्रजासत्ताक, अमेरिका, जर्मनी अशा 15 देशांनी सहभाग घेतला होता.

पहिल्या जागतिक अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेच्या सांगता सोहळय़ास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मल्लखांबामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कर मिळवलेल्या आदित्य अहिरे (सातारा), यशवंत साटम (मुंबई उपनगर), राजेश राव (मुंबई उपनगर), रवींद्र पेठे(पुणे), महेंद्र चेंबूरकर (मुंबई उपनगर), शांताराम जोशी (रत्नागिरी), नंदा शिंदे (मुंबई शहर ), चित्रा खवळे (मुंबई शहर), पंकज शिंदे (पुणे), सत्यजित शिंदे (पुणे), विक्रांत दाभाडे (सातारा), कल्पेश जाधव (मुंबई उपनगर), प्रदीप चेंबूरकर (मुंबई उपनगर) या 13 खेळाडूंकडून स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेचे यशस्वी आयोजन शिवछत्रपती, दादोजी कोंडदेव आणि जीवनगौरव पुरस्कारप्राप्त ‘मल्लखांब महागुरू’ उदय देशपांडे आणि त्यांच्या टीमने केले होते.

जागतिक मल्लखांब अंतिम निकाल

सर्वसाधारण सांघिक जेतेपद

विजेता – हिंदुस्थान (244.73 गुण)
उपविजेता – सिंगापूर (44.45)
तृतीय – मलेशिया (30.22)

सर्वसाधारण जेतेपद (पुरुष)

1) दीपक शिंदे, हिंदुस्थान (84.30)
2) सागर ओहळकर, हिंदुस्थान (83.70)
3)सॅबेस्टियन क्रीमर, जर्मनी (37.25)
सर्वसाधारण जेतेपद ( महिला )
1) हिमानी परब , हिंदुस्थान (74.70)
2) प्रतीक्षा मोरे, हिंदुस्थान (74.40)
3) किको टाकेमोटो, जपान (53.10)

मराठमोळ्या मल्लखांबपटूंनी जिंकली उपस्थितांची मने

महाराष्ट्राची संस्कृती जपणारा मल्लखांब महाराष्ट्रातील अनेक जिह्यांमध्ये मोठय़ा कुशलतेने खेळला जातो. या स्पर्धेच्या निमित्ताने साताऱयाचा कारी मल्लखांब संघ, विलेपार्लेमधील पार्लेश्वर व्यायामशाळा यांनी मल्लखांबाचे सादरीकरण केले. ओडिशामधून आलेल्या श्रीलताने केलेल्या पुरलेल्या मल्लखांबावरच्या सादरीकरणाने हिंदुस्थानात मल्लखांबाचा प्रसार झाल्याचे दिसून आले. मराठमोळय़ा मल्लखांबपटूंनी अफलातून कसरतीचे प्रदर्शन करीत उपस्थित हजारो क्रीडाशौकिनांची मने जिंकली.

स्पर्धेच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने महिला विभागात द्वितीय आलेल्या इटलीच्या डेलिया सेरुटीने दोरी मल्लखांबावर तर जपानच्या कोइको टाकेमोटोने पुरलेल्या मल्लखांबावर आपले संच सादर केले. पुरुष विभागातून दीपक शिंदे आणि सागर ओहळकर यांनी दोरी आणि पुरलेल्या मल्लखांबावर आपले कौशल्य सादर केले.