
सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) परीक्षेत परळीतील पवन नव्हाडे यांनी यश मिळविले आहे.परळी येथील रहिवासी असेलेले किनवट येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त उमाकांत नव्हाडे यांचे ते पुत्र आहेत.नव्हाडे यांच्या यशाने परळीचे नाव उंचावले आहे. पवन नव्हाडे यांनी आपले प्राथमिक-माध्यमिक शिक्षण किनवट येथे पूर्ण केले असून महाविद्यालयीन शिक्षण अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयात पूर्ण केले आहे.तर अभियांत्रिकी शिक्षण नांदेड येथे घेतले आहे.अभियांत्रिकी शिक्षण घेत त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली.गेल्या महिन्यात घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आरटीओ परीक्षेत पवन नव्हाडे यांनी घवघवीत यश मिळविले आहे. प्रशिक्षणानंतर त्यांना नियुक्ती देण्यात येणार आहे.पवन नव्हाडे यांच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.विविध क्षेत्रात नाव उंचावणाऱ्या परळीकरांच्या शिरपेचात या यशाने मनाचा तुरा रोवला गेला आहे.



























































