
सामना प्रतिनिधी । नगर
नगर जिल्ह्यात उसाचा प्रश्न चांगलाच पेटला असताना एफआरपीची थकबाकीसुध्दा मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. ही थकबाकी आता 500 कोटींच्या घरात गेल्याने शेतकर्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला कसा व केव्हा मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. साखर कारखाने शेतातून ऊस तोडून गाळप करत आहेत. गाळप हंगामही शेवटच्या टप्प्यात आहे. कारखाने ऊस तोडून नेत असले तरी ऊस उत्पादकांचे पैसे वेळेत देत नाहीत. गेल्या महिन्यात साडेतीनशे कोटी रुपयांची एफआरपी थकली होती. आता ती वाढून पाचशे कोटी रुपयांपर्यंत गेली आहे.
नगर व नाशिक जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आत्तापर्यंत शेतकर्यांना ’एफआरपी’पोटी 1 हजार 781 कोटी रुपये दिले आहेत. नगरमधील ज्ञानेश्वर, कोपरगाव, मुळा, संगमनेर, संजीवनी या सहकारी कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे सर्व पैसे वेळेत दिले आहेत. गाळपात आघाडीवर असलेल्या अंबालिका या खासगी कारखान्याने 88 कोटी रुपये थकविले आहेत. या कारखान्याने आत्तापर्यंत 67 टक्के रक्कम ऊस उत्पादकांना दिली आहे. प्रवरा येथील विखे पाटील कारखान्याकडे 80 कोटी रुपये थकबाकी आहे. या कारखान्याने आत्तापर्यंत एफआरपीची 50 टक्के रक्कम शेतकर्यांना दिली आहे. रक्कम थकलेले कारखाने टप्प्याटप्याने शेतकर्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करत आहे. एफआरपीची रक्कम थकविणार्या काही कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तालयाने दिले आहेत. त्यामुळे गणेश, केदारेश्वर, तनपुरे, जय श्रीराम या कारखान्यांवर जप्तीची कारवाई सुरू झाली आहे. प्रवरा कारखाना चालवित असलेल्या गणेश कारखान्याकडे 17 कोटी 61 लाख रुपयांची थकबाकी आहे. तर ’केदारेश्वर’कडे 20 कोटी, ’तनपुरे’कडे 27 कोटी 66 लाख, ’जय श्रीराम’ कारखान्याकडे 16 लाख थकबाकी आहे. सुरुवातीला या कारखान्यांची साखर, बगॅस व इतर उपपदार्थ विक्री करून पैसे दिले जाणार आहेत. त्यानंतर थकबाकी राहिल्यास कारखान्यांची स्थावर मालमत्ता विक्री करून शेतकर्यांचे पैसे द्यावे लागणार आहे. थकबाकीवर 15 टक्के व्याजही दिले जाणार आहे. एफआरपी थकविणार्या इतर कारखान्यांचे अहवाल साखर आयुक्त कार्यालयाला देण्यात आलेले आहेत. त्यावर अद्याप काहीच निर्णय झालेले नाहीत.
नगर जिल्ह्यातील खासगी व सहकारी कारखान्यांनी आत्तापर्यंत तब्बल 1 कोटी 12 लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. अजून महिनाभर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू राहणार आहे. त्यातून साखर उत्पादनात आणखी भर पडणार आहे. अंबालिका या खासगी कारखान्याने आत्तापर्यंत सर्वाधिक 13 लाख 69 हजार क्विंटल साखर उत्पादित केली आहे. तर थोरात सहकारी कारखान्याने नऊ लाख 53 हजार क्विंटल साखर उत्पादित केली आहे.
तनपुरे कारखान्याला 2013 च्या गाळपासाठी 106 टन ऊस दिला होता. त्यापोटी कारखान्याकडून सव्वा दोन लाख रुपयांची रक्कम मिळणार होती. परंतू त्यातील काही रक्कम मिळाली. परंतु निम्माहून अधिक रक्कम कारखान्याकडून मिळालेली नाही. मागील एफआरपीची रक्कम कारखाना देत नाही. त्यात पुन्हा कारखान्याने ऊस उत्पादकांचे पैसे थकविलेले आहेत. कारखाने ऊस तोडून नेतात. मात्र पैसे देण्यासाठी अनेक महिने थांबवत आहेत, असे राधू खपके या राहुरी दवणगाव येथील शेतकऱ्याने सांगितले.
एफआरपी थकवलेले कारखाने
कारखाना थकबाकी
- अगस्ती 13 कोटी 94 लाख
- अशोक 10 कोटी 58 लाख
- प्रवरा 80 कोटी 73 लाख
- गणेश 21 कोटी 58 लाख
- कुकडी 27 कोटी 93 लाख
- केदारेश्वर 28 कोटी 18 लाख
- अंबालिका 88 कोटी 6 लाख
- गंगामाई 21 कोटी 78 लाख
























































