दिल्लीतील विश्वचषक स्पर्धा: पाकिस्तानी नेमबाजांची माघार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली 

पुलवामा दहशतवादी हल्ल्याची धग आता क्रीडा क्षेत्रालाही जाणवू लागली आहे. उद्यापासून म्हणजे 20 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत खेळवल्या जाणार्‍या आयएसएसएफ रायफल आणि पिस्तूल वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानचे दोन नेमबाज हिंदुस्थानात येणार नाहीत, असे स्पष्टीकरण नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ पाकिस्तानचे महासचिव राझी अहमद खान यांनी केले आहे. हिंदुस्थानी दूतावासाने पाकिस्तानचे दोन नेमबाज आणि एक प्रशिक्षक यांच्या व्हिसा मंजुरीला विलंब लावल्याने पाकिस्तानी चमू विश्वचषक नेमबाजीत सहभागी होऊ शकणार नाहीत, असे खान यांनी सांगितले.

हिंदुस्थानात पार पडणार्‍या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात पाकिस्तानचे मुहम्मद खालील अख्तर आणि गुलाम मुस्तफा बशीर हे दोन नेमबाज रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात सहभागी होणार होते. त्यांच्यासोबत प्रशिक्षक राझी अहमद हेही हिंदुस्थानात येणार होते. ही स्पर्धा ऑलिम्पिकसाठीची चाचणी स्पर्धा असल्याने आपण हिंदुस्थानी रायफल महासंघानेच आपल्या नेमबाजांना वेळेत व्हिसा मिळवून देण्याची कार्यवाही केली नाही अशी तक्रार आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाकडे करणार असल्याचे पाकिस्तानी रायफल महासंघाचे महासचिव राझी खान यांनी सांगितले.

पाकिस्तानी नेमबाजांना स्पर्धेला पोहचण्यासाठी 20 फेब्रुवारीच्या सकाळच्या विमानाचे तिकीट आपण बुक केले आहे, पण व्हिसाच्या विलंबामुळे आपल्या संघाला स्पर्धेसाठी वेळेत नवी दिल्लीत पोहचणे शक्य नसल्याचे प्रतिपादन खान यांनी केले.