बलात्कार करणाऱ्या आरोपीला दिलासा नाहीच, हायकोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai bombay-highcourt

सामना प्रतिनिधी, मुंबई

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधमाला दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला. ऍट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीने सुटकेसाठी हायकोर्टात अर्ज केला होता, परंतु एखाद्या महिलेची फसवणूक करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आरोपीची सुटका करता येणार नाही असे स्पष्ट करत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

तुझ्याशी लग्न करतो असे सांगून नाशिक जिल्ह्यातील आरोपीने एका महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी सदर आरोपीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुटकेसाठी आरोपीने नाशिकच्या सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला, मात्र सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर आरोपीने हायकोर्टात धाव घेत ऍड. अनिकेत निकम यांच्या वतीने अर्ज दाखल केला.

या याचिकेवर न्यायमूर्ती इंद्रजीत मोहंती आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी सरकारी वकील ऍड. व्ही. बी. देशमुख यांनी कोर्टाला सांगितले की, आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पीडित महिलेवर वारंवार बलात्कार केला आहे. त्यानंतर आरोपीने महिलेशी कोणताही संपर्क ठेवला नाही. पीडित महिलेने फोन केल्यास आरोपी त्याला प्रतिसाद देत नसल्याचे वकिलांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.