
सामना ऑनलाईन, मुंबई
राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये झालेल्या कामांची दखल राष्ट्रीय पातळीवरून घेण्यात आली आहे. ‘जलयुक्त’सारख्या जलसंधारण क्षेत्रातील उत्कृष्ट कामाबद्दल केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2018मध्ये महाराष्ट्राची सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून निवड झाली आहे. याचबरोबर विविध गटातील दहा पुरस्कार राज्याला मिळाले असल्याची घोषण केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाने आज केली आहे.
केंद्रीय जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय जल पुरस्कार 2018 मध्ये महाराष्ट्र राज्याने जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीची नोंद घेतली आहे. जलयुक्त शिवार अभियानाद्वारे महाराष्ट्रातील सुमारे 16 हजार गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. तसेच या कामांमुळे अनेक गावांतील भूजल पातळीत वाढ होऊन पाण्याची टंचाई दूर झाली आहे. गेल्या वर्षांत टँकरच्या संख्येतही घट झाली होती. राज्य शासनाच्या या कामाची दखल केंद्र शासनाच्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये घेण्यात आली आहे.
अन्य पुरस्कार
- सर्वोत्कृष्ट जिल्हा – भूजल पुनरुज्जीवन – नगर
- नदी पुनरुत्थान – प्रथम क्रमांक – लातूर, द्वितीय क्रमांक – वर्धा
- जलस्त्रोताचे पुनरुत्थान – प्रथम क्रमांक – बीडसर्वोत्कृष्ट ग्राम पंचायत, प्रथम क्रमांक – महूद (बु), जि. सोलापूर
- जलसंधारण क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट संशोधन/कल्पना व नवतंत्रज्ञानाचा वापर- तृतीय क्रमांक सद्भावना ग्रामीण किकास संस्था, वर्धा
- जलसंधारण कामाचा प्रसार करणारे सर्वोत्कृष्ट टीव्ही शो- प्रथम क्रमांक – जनता दरबार,दूरदर्शन
- जलसंधारणामध्ये काम करणारी सर्वोत्कृष्ट शाळा – द्वितीय क्रमांक – एस. जी. गर्ल्स स्कूल, जाऊ, ता. निलंगा, जि. लातूर
- उत्कृष्ट जलसंपत्ती नियमन प्राधिकरण – प्रथम क्रमांक- महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण































































