विनाकारण छळणे पडले महागात, पोलिसाची पोलीसअधीक्षकांकडेच तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
police

सामना प्रतिनिधी । परभणी 

नुकतीच जिंतूर येथील उपजिल्हाधिकाऱ्यांना वाळूचा ट्रॅक्टर सोडविण्यासाठी पोलिसाने केलेला फोन महागात पडलेल्या घटनेच्या पाठोपाठच परभणी शहरात कोतवाली पोलिसांनी एका दुचाकीस्वारास विनाकारण छळल्याचे प्रकरण महागात पडल्याची घटना घडली आहे. तक्रारदाराने पोलिसाची तक्रार चक्क पोलीस अधीक्षकांकडेच थेट केल्याने या पोलिसांचे धाबे दणाणले असून विनाकारण छळणे अंगलट आले आहे.

परभणी शहरात बसस्थानक येथून गांधी पार्ककडे येथील रहिवाशी धनंजय रमेशराव जोशी आणि सोबतचा मित्र हे दोघेजण दुचाकीवरून जात असताना कोतवाली पोलीस ठाण्याचे जे की शहर पोलीस नाहीत, रामा पडघन आणि अनय तिघांनी हे दुचाकी वाहन आडवून कागदपत्र आणि परवाना या संदर्भातील चौकशी केली. सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर काहीही त्रुटी आढळल्या नाहीत. तरीही पैशाची मागणी केली. किमान शंभर रुपये तरी द्या असा तगादा लावला. यावेळी धनंजय जोशी यांच्याकडून शंभर रुपये घेत असल्याची मोबाईलमध्ये सोबतच्या मित्राने क्लिप तयार केली. त्यामुळे संतप्त झालेल्या पोलिसांनी एकास गाडीतच डांबून ठेवले आणि मारहाण करून मोबाईल जप्त केला.

तक्रारदार धनंजय जोशी यांनी या संदर्भात पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांची भेट घेऊन पोलिसांच्या वर्तनाबद्दल तक्रार केली. त्यावेळी पोलीस उपअधीक्षक संजय परदेसी यांना या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यावेळी परदेसी यांनी जप्त केलेला मोबाईल धनंजय जोशी यांना परत केला. हा प्रकार चालू असताना पोलिसांनी क्लिप डिलीट केली. दरम्यान, रामा पडघन यांच्यासोबत असलेल्या अन्य तीन पोलिसांची माहिती ही माहितीच्या अधिकारात मागविण्यात आली आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस या चारही पोलीस कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.