विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन चिघळणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या आंदोलनानंतर तिसऱया दिवशी दोन दिवसांत अनुदानाबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन देणाऱया पालिका आयुक्तांनी आठवडा उलटला तरी कोणताच निर्णय घेतला नसल्यामुळे आज शिक्षकांनी थेट आयुक्तांच्या कार्यालयाबाहेरच ठिय्या मांडला. मात्र आजही आयुक्तांनी अनुदान देण्यास नकार दिल्याने दहाव्या दिवशी आझाद मैदानात सुरू असलेले आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला आहे. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे हे आंदोलन चिघळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पालिकेच्या 71 विनाअनुदानित शाळांमधील तब्बल 447 शिक्षकांना गेल्या 15 ते 20 वर्षांपासून फक्त चार-पाच हजारांत राबवून घेतले जात आहे. यामुळे प्रचंड महागाईत या शिक्षकांना कुटुंब चालवणेही मुश्कील झाले आहे. पालिका प्रशासन राज्य सरकारच्या परिपत्रकाचे कारण देत या शाळांना अनुदान नाकारले जात आहे. प्रशासनाच्या या अडेलतट्टूपणाविरोधात गेल्या दहा दिवसांपासून आझाद मैदान शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. या शिक्षकांना अनुदान देण्याबाबत आयुक्त अजोय मेहता यांनी सकारात्मकता दर्शवत दोन दिवसांत निर्णय घेण्याचे आशवासन दिले होते. अनुदानाबाबत शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी येणाऱ्या खर्चाबाबतचा प्रस्तावही आयुक्तांना सादर केला, मात्र त्यावर अद्याप निर्णय झाला नाही.

असा खर्च येणार
पालिकेच्या मान्यताप्राप्त अनुदानित 411 व विनाअनुदानित 685 शाळा आहेत. यापैकी 586 शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. म्हणजे 104 शाळा इतर माध्यमाच्या असून त्यांना अनुदान देणे गरजेचे आहे. त्यांना 2010 पासून अनुदान द्यावयाचे झाल्यास 250 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. पुढील आर्थिक वर्षापासून अनुदान दिल्यास 30 कोटी रुपये आणि सेवानिवृत्ती उपदानासह 40 ते 45 कोटी रुपये दरकर्षी खर्च करावे लागणार आहेत.