
सामना प्रतिनिधी । लातूर
लातूर शहर महानगर पालिकेतील सेवक आणि खाजगी मदतनीस बांधकाम कामगारांकडून प्रमाणपत्रासाठी लाच स्विकारत असताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. दोघांविरुध्द येथील गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर शहर महानगर पालिकेच्या झोन सी मध्ये बांधकाम कामगारांना प्रमाणपत्रावर सही शिक्का देण्यासाठी महानगर पालिकेत सेवक पदावर कार्यरत असणारा राधाकिशन बयास यांनी आणि मदतनीसचे काम करणारा गौस शेख यांनी २०० रुपयांची लाच मागीतलेली होती. या संदर्भात लाच लूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर २१ रोजी सायंकाळी सापळा लावण्यात आला होता. गौस जाकीर शेख याने १०० रुपयांची लाच मागीतलेली होती. तर सेवक राधाकिशन छगनसींग बयास याने सदर कामासाठी आम्ही २०० रुपये घेतो असे सांगून शेख याच्याकडे ५० रुपये द्यावेत असे सांगीतले होते. लाचेची रक्कम स्विकारताना पकडण्यात आले. गांधी चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा सापळा यशस्वी करण्यासाठी प्रभारी पोलीस उपअधिक्षक कुमार दराडे, पोलीस निरीक्षक वर्षा दंडीमे आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.





























































