समुद्राच्या भरतीने हाहाकार.. उरणमध्ये घराघरात गुडघाभर पाणी, रहिवासी थोडक्यात बचावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, उरण

सिडकोने विकासाच्या नावाखाली ठिकठिकाणी केलेल्या भरावाचा जबरदस्त फटका उरणकरांना बसला आहे. नैसर्गिक नाले भरावात गायब झाल्याने समुद्राच्या भरतीचे पाणी बुधवारी रात्री थेट उरणमधील चार गावांमध्ये घुसले. मध्यरात्री घडलेल्या या घटनेने एकच हाहाकार उडाला असून गाढ झोपेतील गावकऱ्यांची अक्षरशः पळापळ झाली. सुदैवाने या संकटातून ग्रामस्थ थोडक्या बचावले आहेत. घराघरात गुडघाभर पाणी साचल्याने रहिवाशांना कच्चाबच्चांसह वृद्धांना घेऊन संपूर्ण रात्र जागून काढावी लागली.

बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास गाककरी साखरझोपेत असतानाच समुद्राच्या भरतीचे पाणी थेट तालुक्यातील फुंडे, नवघर, कुंडेगाव, भेंडखळ गावात अनेक घरांत घुसले. कुंडेगाव तर समुद्राच्या पाण्यातच बुडाल्याने ग्रामस्थांना संपूर्ण रात्र घरातील पाणी उपसण्यात घालवावी लागली. तर नवघर, भेंडखळ, पागोटे, फुंडे गावातील रस्ते समुद्राच्या भरतीमुळे पाण्याखाली गेले होते. सिडकोने मातीचा भराव करताना पाण्याचा निचरा करणारे पारंपरिक नैसर्गिक नाले बुजून टाकल्याने समुद्राचे पाणी गावांमध्ये शिरल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी केला.

  • सिडको, महसूल विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळेच गाव परिसरातील नैसर्गिक नालेच मोठय़ा प्रमाणात होत असलेल्या भरावाच्या कामांमुळे बुजवण्यात आले आहेत.
  • गावांच्या भोवताली सिडकोकडून दगड- मातीचा भराव केला जात आहे. घराच्या पायापेक्षाही अधिक उंचीच्या भरावामुळे समुद्राचे पाणी गावात शिरू लागल्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत.

एकही अधिकारी फिरकला नाही
उशिरा जाग आलेल्या उरण तहसीलदारांनी समुद्राचे पाणी शिरलेल्या गावांची आणि आर्थिक नुकसान झालेल्या घरांची पाहणी करून पंचनामे तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच नेमका आर्थिक नुकसानीचा आकडा सांगता येईल, अशी माहिती उरण तहसील कार्यालयातून देण्यात आली. मात्र तहसीलदारांच्या आदेशानंतरही पंचनामे करण्यासाठी सायंकाळी उशिरापर्यंत एकही महसूल अधिकारी फिरकला नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.