जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला फाशी होत नाही, पण बलात्कार करणाऱ्याला होते!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

एखाद्या व्यक्तीचा अवयव धडापासून वेगळे करणे अथवा त्याला ठार मारणे अशा भयंकर गुह्यातही अनेक वेळेस आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली जात नाही. असे असतानाही बलात्कार करणाऱ्या आरोपीला न्यायालय फाशीची शिक्षा सुनावते. त्यामुळे अशा निकालांमुळे आरोपींच्या मूलभूत हक्कांवरच गदा येत असल्याचा युक्तिवाद आज आरोपींच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात केला.

 मुंबईतील शक्ती मिल कंपाऊंड येथे 22 ऑगस्ट 2013 साली विजय जाधव, मोहम्मद बेंगाली, मोहम्मद अन्सारी आणि सिराज खान या नराधमांनी महिला छायाचित्रकारावर बलात्कार केला होता. त्यापैकी सिराज खान याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर उर्वरित इतर आरोपींना सत्र न्यायालयाने एप्रिल 2014 साली फाशीची शिक्षा सुनावली. दिल्लीतील ‘निर्भया’ बलात्कार प्रकरणानंतर कलम 376 (ई)या कायद्यात सुधारणा करण्यात आली असून संबंधित आरोपीने दोन वेळा बलात्कार केल्यास त्याला जन्मठेपेची अथवा फाशीची शिक्षा ठोठावण्यात येऊ शकते अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आरोपींनी या सुधारणेला हायकोर्टात आव्हान दिले आहे. आरोपींच्या वतीने ऍड. युग चौधरी यांनी आज कोर्टात बाजू मांडली. या याचिकेवर बुधवारी केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसीटर जनरल अनिल सिंग हे युक्तिवाद करणार आहेत.