परभणीत धार रोडवर अतिक्रमण हटाव मोहिम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। परभणी

शहरातील धार रोडवरील प्रभाग क्रमांक 2 व 7 या भागात मागील काही वर्षांपासून अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढल्याने रस्ता दिवसेंदिवस अरुंद झाला होता. वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण धारकांनी हे अतिक्रमण काढले नव्हते. यामुळे महानगरपालिकेने दोन्ही प्रभागा अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली आहे.

परभणी शहरातील मध्यवस्तीतील अतिक्रमण काढल्यानंतर महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहिम थंडावली होती. धार रोडवर मोठ्या अतिक्रमण थाटल्याच्या तक्रारी मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेऊन मनपा प्रशासनाने अतिक्रमणधारकांना या संदर्भात वारंवार नोटीसा बजावल्या. नोटीसा बजावून देखील या भागातील अतिक्रमण चालूच होते. महानगरपालिकेने आज शनिवारी सकाळी प्रभाग क्रमांक 2 व 7 या भागात अतिक्रमण हटाव मोहिम राबविली. या मोहिमेंतर्गत रस्त्यावर थाटलेली दुकाने जमिनदोस्त करण्यात आली. महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या वाहनाचा ताफा या प्रभागात नेऊन त्या ठिकाणचे अतिक्रमण हटविले. काही नागरिकांनी अतिक्रमण स्वत: काढण्यास सुरुवात केली. तर काही ठिकाणी मनपाने जबरदस्तीने कारवाई करत वादग्रस्त जागेवरील अतिक्रमण हटविले आहे. परिणामी या परिसरातील नागरिकांनी बऱ्याच वर्षानंतर मोकळा श्वास घेतला. या रस्त्यावर हॉटेल, पानटपरी, मोटार गॅरेज तसेच छोटेमोठे व्यावसायांची दुकाने गेल्या अनेक वर्षापासून तळ ठोकून होती.