प्रशांत मोरे व रश्मी कुमारी यांनी पटकाविले विजेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कुडाळ

अखिल भारतीय कॅरम महासंघ आयोजित व महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम संघटनेच्या यजमान पदाखाली भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत व बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ऑईल, ओएनजीसी व सारस्वत बँक सह पुरस्कृत कुडाळ येथील 47 व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुरूष एकेरी गटात आयआरबीच्या प्रशांत मोरे तर महिला एकेरी गटात पेट्रोलियम स्पोर्टस् बोर्डाच्या रश्मी कुमारी यांनी विजेतेपद पटकाविले.

कुडाळ उद्यमनगर येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे गेले पाच दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून कॅरमचा महासंग्राम रंगला होता. शनिवारी पुरूष व महीला गटातील अंतिम सामने रंगले. पुरूष एकेरी अंतिम सामन्यात आयआरबीचा प्रशांत मोरे याने विदर्भचा इर्शाद अहमद याचा 22-21, 25-13 असा पराभव करीत अंतिम विजेतेपद पटकाविले. तर महीला एकेरी अंतिम सामन्यात पेट्रोलियम स्पोर्टस् बोर्डाच्या रश्मी कुमारीने जैन इरिगेशनच्या आयेशा महम्मद हिचा 19-7, 25-7 असा पराभव करून अंतिम विजेतेपद पटकाविले. तसेच पुरूष वयस्कर एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या शब्बीर खानने विजेतेपद तर महाराष्ट्राचा अस्लम चिकते याने उपविजेतेपद पटकाविले. तर महिला वयस्कर एकेरी गटात अंतिम सामन्यात महाराष्टाच्या मालती केळकरने विजेतेपद तर महाराष्ट्राच्या रोझिना गोदाद यांनी उपविजेतेपद पटकाविले. पंच प्रमुख म्हणून पी.मनोज, देबाशिष, केतन चिखले, अजित सावंत, भारत भूषण तर पंच म्हणून मंदार कसारे, प्राजक्ता नारायणकर, सुहास कारभारी, राम पडगील, विजय शेर्ला, महेश बोडस, अरविंद नाटाकर, आशिष बागकर व अमेय पेडणेकर यांनी काम पाहीले.

बक्षिस वितरण प्रसंगी विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय कॅरम महासंघाचे अध्यक्ष जोसेफ मेयर (स्वित्झरलंड), मुख्य सचिव व्ही.डी.नारायण, भारती नारायण, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरूण केदार, शांताराम गोसावी, अविनाश टिळक, बैजनाथ सिंग, दिलिप वाडकर, एलआयसी सिनियर ब्रॅन्च मॅनेजर प्रमोद गुळवणी, सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.अवधूत (सुधीर) भणगे, सरचिटणीस योगेश फणसळकर, सुनील धुरी, कुडाळ तालुका कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष शुक्राचार्य म्हाडेश्वर आदींसह पदाधिकारी, सदस्य व खेळाडू उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. यावेळी उद्योजक बापू नाईक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. निवेदन अजित सावंत यांनी केले.