भराड़ी देवीच्या यात्रोत्सवाचा उत्साह; भाविकांच्या स्वागतासाठी आंगणेवाडी सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीतील भराडी मातेच्या यात्रोत्सवाला सोमवारी पहाटे 3 वाजल्यापासून सुरवात होणार आहे.सकाळी 3 वाजल्यापासून देवीच्या दर्शनाची व ओटी भरणा कार्यक्रमाला सुरवात होणार आहे. यात्रोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांना सुलभ दर्शन व्हावे या हेतूने मंडळासह प्रशासनाने सर्व सुविधा पुरविल्या आहेत. उड्डाण पुलासह 10 रांगातून भाविकांना देवीच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

मंडळाच्या वतीने दोन वर्षांपासून ड्रोन कॅमेराचा वापर करून यात्रेचे चित्रीकरण करण्यात येत आहे. यावर्षीही मंदिर व यात्रा परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह यात्रेचे ड्रोन चित्रीकरण होणार आहे. चोख पोलीस बंदोबस्त, भव्य मंडप, याबरोबरच विद्युत रोषणाई व आकर्षक मोहक अशी फुलांची आरास करून मंदिर सजवण्यात आले आहे. यात्रोत्सवात आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर सजवण्यात आले आहे. याबरोबरच फुलांची मोहक अशी विलोभनीय आरास करण्यात आली आहे. मंदिर परिसर भव्य मंडप व विद्युत रोषणाईत झळाळून निघाला आहे. ठिकठिकाणी मंडळाच्या वतीने शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत. तर डिजिटल स्वागत कमानीही उभारण्यात आली आहे. लाखो भाविक आई भराडीच्या दर्शनास येतील हे गृहीत धरुन सुरळीत दर्शन व्यवस्था व परिसर व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान मोड यात्रेने मंगळवारी सायंकाळी आंगणेवाडी यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.

भराडी मातेचा हा वार्षिक उत्सव यशस्वी करण्यासाठी आंगणे कुटुंबीय, ग्रामपंचायत, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन व सर्व संबंधित विभाग यांच्या सहकार्यातून, नियोजनातून यात्रेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. आंगणेवाडी परिसर दुकानांच्या गर्दीने सजला आहे. मंडळाच्या वतीने शेकडो स्वयंसेवक तैनात ठेवण्यात आले आहेत. दहा विविध रांगातून भाविकांना अवघ्या काही मिनिटातच दर्शन मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. व्हीआयपी, मंत्री यांच्यासह आपत्कालीन व्यवस्था व अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांग व मार्ग असणार आहे. एकूणच मंडळ व प्रशासन यांच्याकडून सर्व तयारी पूर्ण केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता यावर्षी आंगणेवाडी उत्सवात भाविकांसह राजकीय नेतही येण्याची शक्यता आहे. व्हीआयपींची संख्याही वाढेल असा अंदाज वर्तवत भाविक व नेते मंडळीं यांच्यासह यात्रा सुरक्षेसाठी 400 पोलीस कर्मचारी- अधिकारी, सीआरपी पथके अधिकाऱ्यांसह तैनात ठेवली गेली आहेत. येणाऱ्या मंत्री व अन्य व्हीआयपी यांना सुलभ दर्शन मार्ग आहे. तसेच हेलीप्याडही सज्ज ठेवण्यात आले आहे. यात्रोत्सवात केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार वैभव नाईक, मुबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह काही मंत्री, खासदार, आमदार नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित राहून दर्शन घेणार आहेत. यात्रोत्सवासाठी जादा गाड्या, आरोग्य पथके, महसूल पथके, वीज वितरण, बीएसएनएल व अन्य सर्व विभाग सज्ज झाले आहे. पाण्याचा मुबलक पुरवठा करण्यात आला आहे. सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. बच्चे कंपनीचे आकर्षण खेळणी यात्रेत स्पेशल असणारा मालवणी खाजा, दुकाने व हॉटेल गजबजली आहेत.