लेख : स्वातंत्र्यवीर सावरकरांची अंदमानातील हिंदू जागृती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नेहा जाधव

स्वातंत्र्यवीर सावरकर जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी धर्माला अनुसरून सुधारणा घडवून आणल्या. अगदी काळ्या पाण्याची शिक्षा भोगाव्या लागलेल्या अंदमानातील सेल्युलर जेलमधील काळकोठडीतही त्यांनी हिंदू जागृतीचे कार्य सुरूच ठेवले. आपल्याला आता दुहेरी जन्मठेप मिळाली, त्यामुळे स्वांतत्र्यसाठीचे योगदान हातून गेले, आपल्या स्वप्नातले राष्ट्र निसटले याचे दुःख ते करत बसले नाहीत. उलट जे जे हाती लागले त्याचा उपयोग त्यांनी हिंदू हितासाठी आणि हिंदू जागृतीसाठी केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर महान क्रांतिकारकांपैकी एक. त्यांनी सर्वतोपरी राष्ट्राची सेवा केली. सावरकरांना शिक्षण, धर्म याचबरोबर राष्ट्ररक्षणात रस होता हे त्यांच्या एकंदरीत जीवन प्रवासावरून दिसून येते. त्याच वेळी वैदिक धर्मात काळ आणि आवश्यकतेनुसार बदल अपेक्षित आहेत हेदेखील ते जाणून होते. त्यांच्या अनेक भाषणांत तसे उल्लेख आढळून येतात. स्वातंत्र्यासाठीच्या धुमसत्या क्रांती काळात ज्वलंत हिंदुत्व मांडणारे सावरकर हे एकमेव अग्रणी हिंदू नेते असावेत. त्याग आणि बुद्धीची अफाट जोड असणारे तात्याराव हिंदूंचा विषय निघाला की अतिशय परखड भूमिका मांडत. कारण हिंदू विघटन ही पारतंत्र्याची मूळ अडचण त्यांनी जाणली होती. त्यामुळे हिंदू तरुणांना एकत्र करून ते मार्गदर्शन करत. सुरुवातीच्या काळात हिंदुस्थानात राहणाऱ्या हिंदू-मुस्लिम या दोहोंनाही स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अन्याय, अत्याचाराचा, ध्येयाचा आणि लढण्याचा समसमान वाटा असेल असे सावरकरांनाही वाटत असे, मात्र अंदमानमधील कारावासप्रसंगी त्यांना जाणवले की हिंदूंना पोलादी करण्याची गरज आहे.

1909 पर्यंत ब्रिटिश सरकार मुसलमानांना विशेष सवलती देई. 1916 पासून खुद्द हिंदूच त्यांना सवलती देऊ लागले. हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येऊन करार केला तो म्हणजे लखनौ करार. ज्याचे टिळकांनी luck now असे वर्णन केले होते. त्यानंतर हिंदू-मुस्लिम एकत्र भावासारखे नांदतील अशी शपथ दोघांनी घेतली, पण ती पाळली केवळ हिंदूंनी. खिलाफत चळवळ हिंदूंनी आपली मानली, कारण महात्मा गांधी यांनी त्याला आपली म्हणायला भाग पाडले. मात्र त्याचे बक्षीस म्हणून नंतर मलबार प्रांतात हिंदूंच्या मुली, बायका यांच्यावर बलात्कार केले गेले, हिंदूंच्या घराची राखरांगोळी केली गेली, हिंदूंचे इस्लामीकरण केले. त्यातूनच स्वामी श्रद्धानंद यांचा खून अब्दुल रशीदने केला.

अंदमानात आल्यावर सावरकरांनी जी परिस्थती पहिली त्यावरून त्यांच्या लक्षात आले की, देशाला स्वातंत्र्य मिळवण्याआधी हिंदूला मानसिकदृष्टय़ा सक्षम करणे गरजेचे आहे. अंदमानातील हिंदू बंदिवानांसोबत घडणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या घटना सावरकरांनी केवळ पाहिल्या नाहीत तर त्या अनुभवून त्यात तग धरून उभे राहण्याची हिंमत त्यांनी हिंदूंना दिली. हिंदू कैद्यांसोबत होणारे चुकीचे व्यवहार आणि मुस्लिम कैद्यांना मिळणारी वेगळी वागणूक ही सावरकरांनी पाहिली. देशाच्या स्वांतत्र्यासाठी हिंदू-मुस्लिमांचा समसमान सहभाग असेल या तात्यारावांच्या विचाराला तडा गेला. कैद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पठाण होता. त्यामुळे तिथे मुसलमानांना नमाजमध्ये सूट मिळत होती, पण हिंदूंना मानसिक त्रास दिला जात होता. अंदमानात सावरकर प्रखर हिंदुत्ववादी होण्यास कदाचित तेथील ही परिस्थिती कारणीभूत होती. हिंदुस्थानवर जर्मन कैसरची स्थापना तुर्कस्थानचा सुलतान करणार, आता हिंदुस्थानवर सुलतानाचे राज्य येणार असून जे मुसलमान होणार त्यांना बढाई आणि जे हिंदू राहणार त्यांना अन्यायी वागणूक मिळणार अशी वार्ता तेथे पसरवली जाईल. हिंदू कैदी बाहेर जात नसल्याने त्यांना ही गोष्ट खरी वाटे. सावरकरांनी एकदा एकाला पकडले आणि त्या वाक्यामागची सत्यता विचारली. तर मला बाजारात एका पत्रकावर लिहिलेले आढळले असे उत्तर आले. त्यावेळी सावरकरांना लक्षात आले की हा हिंदूंना घाबरवून टाकण्याचा प्रकार आहे. मग सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली हुशार हिंदूंनी हा प्रचार केला की सुलतान हा आर्य होणार. त्यामुळे मुस्लिम जर हिंदू झाला नाही तर मुस्लिमांचे हाल होणार. अशा प्रकारे हिंदूंनी मुसलमानांविरोधात मानसिक पहिली लढाई जिंकली. तुरुंगातील हिंदूंमध्ये इस्लामी धर्माचा प्रसार पद्धतशीररीत्या करण्यासाठी तेथील मुसलमानांचे एकमताने प्रयत्न चालत. एखादा हिंदू व्यक्ती जर मुसलमान झाला तर त्याला पुन्हा हिंदू सामावून घेत नसत. ही गोष्ट लक्षात घेऊन अंदमानातच सावरकरांनी हिंदूंच्या शुद्धीकरणाचे कार्य सुरू केले. एका हिंदू कैद्याला मुसलमानांनी मुसलमान केले. त्याला हिंदू आपल्या पंक्तीत बसवत नसत. हिंदूंच्या एकीकरणासाठी तात्यारावांनी सगळ्यांसमोर त्याला रोज साबणाने स्नान करवून आपल्या पंक्तीत बसवले. असे अनेकदा झाल्याने नंतर त्याला अनेकांनी स्वीकारले.

अंदमानातील कारावासात हिंदू आणि मुस्लिम बंदिवानांसाठी स्वतंत्र स्वयंपाक होत असे. स्वयंपाक झाल्यावर जेवणास बसण्यापूर्वी एक मुसलमान बंदिवान हिंदूंच्या अन्नपात्रांना स्पर्श करून निघून जात असे. ‘मुसलमानाने स्पर्श केलेले अन्न खाल्ले तर आपण बाटू’ या भीतीमुळे हिंदू बंदिवानांनी 4-5 दिवस अन्न घेतले नाही. ही गोष्ट सावरकरांच्या कानावर गेली. या लोकांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल हे हेरून सावरकरांनी एक युक्ती केली. सावरकरांनी एका करवंटीत पाणी घेऊन ‘अपवित्रः पवित्रो वा: ’  हा शुद्धिमंत्र म्हणत सर्वांच्या अन्नावर शिंपडले आणि म्हणाले, ‘हे अन्न आता अभिमंत्रित झाले. त्यामुळे आता जो हे अन्न खाईल तो हिंदू झाला.’ असे झाल्यावर मात्र मुसलमानांवर उपासमारीची वेळ आली. त्यांनी नमते घेतले आणि सर्वांनी आपापले अन्नच खाणे सुरू केले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदूंना मुस्लिमांकडून होणाऱ्या अन्यायापासून मुक्तच केले नाही तर त्यांना देशसेवेसाठी तयार केले. त्यासाठी तात्यारावांनी तुरुंगात शिक्षणप्रसार केला. मुस्लिमांना वाचायला कुराण ठेवलेले असे, पण चार हिंदू बसून जर गीता वाचत असतील तर त्यांना फटके पडत. सावरकरांच्या कार्याचा मूळ मुद्दा बंदिवानाला शिक्षण देणे होते, पण त्यावेळी एक हिंदू बंदिवान दुसऱ्या हिंदू बंदिवानासोबत बोलू शकत नव्हता. तेव्हा दोरखंडे वळायला 3-4 बंदी एकत्र येत त्यावेळी सावरकरांनी शिक्षण द्यायला सुरुवात केली. सावरकर सर्वांना ऐतिहासिक गोष्टी सांगत. वेदकालापासून, इतिहास, अर्थ, खगोल, हिंदुस्थान, फ्रान्स, युरोप असा सर्व देश आणि खंडांचा इतिहास ते सांगू लागले. लिखाणाची व्यवस्था नसल्याने भिंतीने कागदाची आणि चुना, खिळ्याने लेखणीची जागा घेतली. बंदिवानांची संख्या वाढल्याने त्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणून पुस्तकांची व्यवस्था सुरू केली. अशा शिक्षितांचा आकडा 40 होता. शिक्षण देणे सुरू झाल्यावर अशा हिंदूंची संख्या 90 झाली होती. जुगार, भांडण करणारे बंदी खोलीत पुस्तक वाचण्यात मग्न झाले होते. हे सावरकरांच्या सेल्युलर जेलमधील शिक्षण चळवळीचे फळ होते.

सावरकर जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी धर्माला अनुसरून सुधारणा घडवून आणल्या. अगदी काळ्या पाण्याची शिक्षा भोगाव्या लागलेल्या अंदमानातील सेल्युलर जेलमधील काळकोठडीतही त्यांनी हिंदू जागृतीचे कार्य सुरूच ठेवले. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्वार्थापोटी आणि राजकीय द्वेषातून विशिष्ट चौकटीत ‘बंदी’ केले जाते, पण

आर्यबंधु हो उठा उठा का मठासारखे नटा सदा ।

हटा सोडूनी कटा करू या म्लेंच्छपटा ना धरू सदा ।।

या ओळी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी रचणारे स्वा. सावरकरच होते हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.