
सामना प्रतिनिधी । वडवणी
वडवणी तालुक्यातील निराधारांच्या प्रश्नांसह इतर समस्या सोडविण्यासंदर्भात दिलेल्या निवेदनाची दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या शिवसेना जिल्हा उपसंघटक प्रमीला माळी यांनी वडवणी तहसील कार्यालयावर मंगळवारी बांगडी व घुंगरू मोर्चा काढला. हा मोर्चा एवढा मोठा होता की प्रशासन हादरले आणि लवकरच मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले.
वारंवार प्रमीला माळी यांनी वडवणी तालुक्यातील निराधारांचे प्रश्न आणि अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबाबत लेखी निवेदन दिले होते. ऑगस्ट महिन्यात झालेल्या बैठकीत मंजूर झालेली यादी अजूनही अतिम झालेली नाही. हजारो निराधार अनुदानापासुन वंचित आहेत. त्याचबरोबर तालुक्यात सध्या गंभीर दुष्काळी परिस्थिती असताना पाण्याचे टँकर दिले जात नाही. दारिद्रयरेषेतील नागरिकांना रेशन मिळत नाही. या सर्व समस्या सोडविण्यासाठी तसेच निराधारांचे मानधन प्रतिमहिना एक हजार करावे, बांधकाम मिस्त्री, पेंटर यांचा दारिद्रयरेषेत समावेश करून दोन हजार रूपये प्रतिमहिना मानधन द्यावे, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांचा दारिद्रयरेषेत समावेश करावा या मागण्यांकडे प्रशासन डोळेझाक करत आहे. यामुळे संतप्त झाल्याने मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय असल्याने प्रशासन हादरले आणि तात्काळ मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक उपस्थित होते.
























































