नगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस उग्र; टँकरचा आकडा पाचशेंच्या घरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस उग्र स्वरुप धारण करु लागली आहे. उन्हाळा वाढू लागला तसतसे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होवू लागली आहे. आजमितीस 376 गावे आणि 1 हजार 947 वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसल्या आहेत. या टंचाईग्रस्त गावांतील तब्बल 8 लाख 15 हजार 216 लोकसंख्येला 485 टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरु आहे.

सलग दोन वर्षे जिल्हाभरात मुसळधार पावसाची हजेरी लागली. त्यानंतर म्हणजे 2018 मधील पावसाळा मात्र सर्वसामान्य जनतेचा अंत पाहाणारा ठरला आहे. वेळेवर आणि पुरेसा पाऊस झाला नसल्याने खरीप आणि परतीच्या पावसाने दगा दिल्याने,रब्बी हंगामातील पिके वाया गेली आहेत. सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाल्याने, नदी, नाले वाहिले गेले नाहीत. परिणामी भूजलपातळी कमालीची घटली आहे. भंडारदरा धरण वगळता जिल्हाभरातील उर्वरित लहान-मोठी धरणे भरली गेली नाहीत. त्यामुळे ऐन पावसाळयामध्येच पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. संगमनेर व पाथर्डी तालुक्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येच टँकर धावू लागले.

सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि भूजलपातळीत झालेली कमालीची घट त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. गेल्या दोन वर्षी फेब्रुवारी महिन्यात एकही टँकर धावला नाही. त्या फेब्रुवारी महिन्यात यंदा मात्र टँकरची संख्या पाचशेंच्या घरात गेला आहे. पाणीटंचाईची सर्वांत अधिक झळ पाथर्डी तालुक्याला लागली आहे. या तालुक्यातील 100 गावे आणि 541 वाड्यांत भीषण टंचाई निर्माण झाली आहे. या तालुक्यातील 2 लाख 13 हजार जनतेला तब्बल 125 टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

पारनेर तालुका देखील दुष्काळाच्या झळामुळे कासावीस झाला आहे. 62 गावे आणि 412 वाड्यांतील दीड लाख लोकसंख्येला 90 टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरु आहे. उन्हाळा लागला की, संगमनेर तालुक्यातील काही भागाला टँकरची आठवण येते. 46 गावे आणि 158 वाड्यांतील पाऊणलाख जनतेला दररोज टँकरची वाट पाहावी लागत आहे. या तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून 38 टँकर धावत आहेत.