
>> श्रीकांत उंडाळकर [email protected]
आवडीचे आरामदायी काम… आणि भरपूर पगार… आपल्या नोकरदार माणसांच्या दृष्टीने चैनच. आवडीचे काम म्हणजे…? आईस्क्रीम खाणे, सुगंध… सौंदर्याच्या जगात मस्त विहार… भरपूर आराम… भरपूर पैसा… जगाच्या पाठीवर काही देशांत चला… आवडीचे काम करा… खूप पैसे कमवा!
रांगेत उभे राहा
आपण विविध कामांनिमित्त अनेक ठिकाणी जात असतो. अशा वेळी प्रवास करावा लागतो. तिकीट काढावे लागते. सरकारी ऑफिस तसेच बँका व विविध कार्यालये अशा अनेक ठिकाणी रांगेत उभे राहावे लागते. अनेक लोकांना अशा रांगेत उभे राहणे कंटाळवाणे आणि वेळखाऊ वाटत असते. यासाठी व्यावसायिकरीत्या तुमच्यासाठी रांगेत उभी राहणारी व्यक्ती तुम्ही पैसे देऊन उभी करू शकता. सध्या या कामाचा पर्याय अनेक लोक निवडताना दिसतात.
शांत झोपेतून पैसा
सध्या एक नवीन जॉब सुरू झाला आहे. ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे किंवा खूप कमी झोप आहे अशांना शास्त्रज्ञ शोधून आणून त्यांच्यावर विविध प्रयोग करत असतात. म्हणजे झोपायचेच पैसे मिळतात आणि तेही चांगले लाखोंमध्ये. याहून सुख ते काय असेल!
नवरीसोबत फोटो
तुम्हांला फोटोसाठी वेगवेगळ्या ढंगात उभं राहण्याची कला अवगत असेल तर अनेक अमेरिकन आणि युरोपियन देशांमध्ये लग्नात त्यांना चांगले पैसे दिले जातात. यात असे लोक नवऱया मुलीसोबत छान पेहराव करून फोटो काढतात आणि यात फक्त एक-दोघी जणी सामील नसून 12 ते 15 मुलींचा घोळका असतो. आहे की नाही जगावेगळं काम!
नेल पॉलीशला नाव द्या
नेल पॉलिशचे नाव ठेवणे. या नोकरीत तुम्हाला नेल पॉलिशला नावे द्यायची असतात. यामध्ये नवनवीन नेल पॉलिशच्या रंगाच्या हिशेबाने त्यांचा दर्जा, वैशिष्टय़े या गोष्टी लक्षात घेऊन नावे देऊन तुम्ही या क्षेत्रात यशस्वी होऊ शकता.
मित्र-मैत्रिण मिळवा
अनेक दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये तुम्ही भाडय़ाने मित्र किंवा मैत्रिण घेऊ शकता आणि त्यांच्यासोबत तुमचा एकाकीपणा दूर करू शकता. जर तुमच्याजवळ कुणी मित्र-मैत्रिण नाही आणि जो तुम्हाला प्रेम व विश्वास देऊ शकेल, तर अशांसाठी तुम्ही एक चांगला मित्र किंवा मैत्रीण होऊ शकता. एक संवेदनशील काम म्हणून गेल्या काही काळापासून तरुण वर्ग या नोकरीकडे पाहू लागला आहे. एकमेकांचा वेळही जातो आणि यातून मैत्री आणि पैसे दोन्ही गोष्टी मिळतात.
लाखांचे अश्रू
लग्नसमारंभ किंवा अशा अनेक शुभ असलेल्या कार्यक्रमाला तर पैसे मिळतातच, पण जेव्हा माणूस मृत्यू पावतो तेव्हा रडण्यासाठीदेखील स्त्राr-पुरुष पैसे देऊन मागविले जातात. आपल्या हिंदुस्थानातच नाही तर अनेक पाश्चिमात्य देशांतही अशा कामाला पैसे मिळतात.
दे धक्का…
जपानमध्ये लोक मेहनती आहेत. कोणत्याही प्रकारच्या कामाला ते कधीच कमी लेखत नाहीत. म्हणून पडेल ते काम करून ते अभिमानाने जगत आहेत. जपानमध्ये ‘प्रोफेशनल पुशर’ असा एक जॉब आहे. आता नुसतं धक्का देणं यात काय आलंय कौशल्य…? पण जपानमध्ये तेथील ट्रेनमध्ये लोकांना कोंबून भरण्यासाठी मागे हे पुशर फायद्याचे ठरतात. हे पुशर गर्दीने भरलेल्या ट्रेनमध्ये लोकांना धक्के देऊन भरतात. यामुळे कुणाचीच ट्रेन चुकत नाही. आहे की नाही कमाल…!
सुगंधाची चाचणी
डिओड्रंटचा आणि टिश्यू पेपरचा सुगंध किती चांगला आहे, तो किती काळ अंगावर राहतो याची खातरजमा करण्यासाठीदेखील चांगल्या पगाराची नोकरी मिळते. आहे की नाही मजेशीर काम…
लग्नातले पाहुणे
लग्नकार्य काढलंय? मग लग्नातल्या पाहुण्यांचं काय… लग्नात गर्दी कशी दिसणार! जपानी लोकांनी त्यावरही उपाय शोधलाय. काही संस्था फक्त लग्नात पाहुणे पुरवण्याचे काम हाती घेतात. या लोकांना महिन्याचा पगार तर मिळतोच, पण त्याबरोबरच लग्नातलं जेवणही भरपेट मिळतं ते वेगळंच. मग! काय म्हणताय, जाताय लग्नात पाहुणे म्हणून जॉबला…
रोज खा आईस्क्रीम
तुम्ही आईस्क्रीमसाठी वेडे आहात तर ही नोकरी फक्त तुमच्यासाठीच आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आईस्क्रीमची चव घेऊन त्यांना नावे द्यायची असतात. अनेक कंपन्या अशा नोकऱया ऑफर करत आहेत.


























































