
अभिनयाचं वेड तसं मला एसआयईएस कॉलेजमध्ये असल्यापासूनच होतं. मी कुणाचीही नक्कल अगदी त्याच्या हुबेहूब आवाजासह करू शकत होतो. कॉलेजमध्ये इतर मुलांची टिंगल करण्यासाठी किंवा फार तर कॉलेज गॅदरिंगमध्ये मी मिमिक्री करायचो. पण कॉलेज संपलं तसं मला आपल्यामध्ये ही फार मोठी कला असल्याचं जाणवलं… मग त्या दृष्टीने नीट प्रयत्न केले. अभिनयाचा किडा होताच. सिनेमात काम करावं असं वाटत असतानाच एक दिवशी एका स्पर्धेत सहभागी होण्यासाठी माझ्या वरिष्ठांनी सांगितले आणि मी भाग घेतला. मनात खूप भीती होती, पण मागे कळू शकत नव्हतो, मी तसाच गेलो आणि मिमिक्रीला सुरुवात केली… आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकांचा छान प्रतिसाद मिळाला. हळूहळू मग मी वेगवेगळय़ा स्पर्धेत भाग घेऊ लागलो, काही जिंकलोसुद्धा… पण नेहमीच काही न काही शिकत गेलो. मी माझे लक्ष मग लघुपटांवर केंद्रित केलं. कॅमेरासमोर अभिनय कसा करायचा, काय वेगळेपण असतं हे जाणून घेतलं.
माझा हा दोन वर्षांचा प्रवास आता संपत आला होता. मी महाविद्यालय बदलले होते. नवीन लोक, नवीन आवडीनिवडी… पण तिथेसुद्धा माझ्या मित्रांनी मला खूप साथ दिली. वेळोवेळी योग्य तेच सल्ले दिले. माझं स्पर्धेत भाग घेणं, लघुपट करणं चालू असतानाच एसआयईएस कॉलेजमधल्या माझ्या एका वरिष्ठ मित्राने माझं काम पाहून फोन केला व म्हटले, एक हिंदी चित्रपट आहे. एक लहान भूमिका आहे, त्यांचं वाक्य संपायच्या आधीच मी हो म्हणून टाकलं! त्यानंतर अंतिम फेरीत माझी निवड झाली आणि मला तो रोल मिळाला. त्या वेळी शूटिंगला खूप मजा आली. खूप आठवणी मनात साठवून ठेवल्यात. राज अर्जुन, नीरज सूद, शकील खान अशा कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. शुभंकर एकबोटे हा जिवलग मित्रही तेथेच सापडला.
कॉलेजमध्ये मिमिक्री हा माझा फक्त छंद होता. पण तोच आता माझा रोजीरोटीचा धंदा बनला आहे. हा प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. आजसुद्धा मी प्रयत्न आणि मेहनत यावरच जोर देतोय. कारण मेहनत केल्याशिवाय कुणालाच काही मिळत नाही हे मी पक्के जाणतो. दादरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी राहतोय हे माझं भाग्यच… म्हणूनच अभिनेता म्हणून संघर्ष करणं मला जमतंय. आता माझा फक्त एकच ध्यास आहे तो म्हणजे आपल्या कलेने लोकांना जवळ करायचे. सध्या मी कीर्ती कॉलेजमध्ये बीएमएम करतोय. माझ्या यशात माझ्या आईचा मोठाच वाटा असेल. कारण ती नेहमी माझ्या पाठीशी असते. मला हिंमत द्यायला… माझं कौतुक करायला… आणि माझं सांत्वन करायलाही फक्त तीच असते. पण तीच माझी खरीखरी समीक्षकही आहे हेही खरेच…
वेगळ्या वाटेवरचे छंद तरुणाईला नेहमीच खुणावतात. आपला अभ्यास सांभाळून निवडलेली वेगळी वाट आम्हालाही सांगा… छायाचित्रासहित.
आमचा पत्ता ः Gen Next, शेवटचे पान, दै. ‘सामना’, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-25 [email protected] वरही पाठवता येईल.

























































