धनगर समाजाला आदिवासींच्या योजना लागू, उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांना यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
dhangar-hingoli

सामना प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील धनगर समाजाला आदिवासींच्या योजना लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. आदिवासी समाजाच्या योजनांना धक्का न लावता दहा ठिकाणी स्वतंत्र शासकीय आश्रमशाळा, प्रत्येक विभागात वसतिगृह, प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, भूमिहीनांना जमीन खरेदीसाठी अर्थसहाय्य व पहिल्या टप्प्यात दहा हजार घरकुले अशा योजना राबवण्यात येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

धनगर समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी धनगर समजाच्या नेत्यांनी मध्यंतरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी धनगर समाजाच्या नेत्यांसोबत ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती.
या पार्श्वभूमीवर ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, जलसंधारणमंत्री राम शिंदे, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता उपस्थित होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव
सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्यावर एकमत या बैठकीत झाले. त्याची अधिसूचना येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काढण्यात येणार येईल.

धनगर समाज शैक्षणिक प्रवाहात
आदिवासी समाजाच्या योजना धनगर समाजाला लागू केल्यामुळे धनगर समाजाचा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकास होण्यास मदत होईल. त्यामुळे धनगर समाजाची प्रगती होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी दिली.

नामकरणाला परवानगी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाचा विस्तार करण्यात आला. यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्योजकता विकास तथा मेंढी व शेळी महामंडळ असे नामकरण करण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी परवानगी दिली आहे. धनगर समाजाची लोकसंख्या ज्या ठिकाणी जास्त आहे तेथे चराई क्षेत्र राखीव ठेवण्यास मान्यता दिली आहे. धनगर समाजाला आदिवासींच्या योजना लागू करण्यात आल्या असून आदिवासींच्या निधीस धक्का न लागू देता स्वतंत्र निधी देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘टीस’च्या अहवालावर कार्यवाही
धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ‘टीस’ अर्थात टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालावर पुढील कार्यवाही वेगाने करण्यासाठी तसेच केंद्र सरकारकडे शिफारस करण्यासाठी हा अहवाल राज्याच्या महाधिवक्त्यांकडे सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला. उच्च न्यायालयातील याचिकेमध्ये सुयोग्य बाजू मांडण्यासह या संपूर्ण प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय समितीने घेतला.