कलावंतांच्या उपोषणाचा चौथा दिवस; तीनजणांची प्रकृती खालावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जामखेड

आम्ही कोल्हाटी समाजाचे म्हणून आम्हाला कोणी कामाला ठेवत नाही. घर बांधण्यासाठी जागाही मिळत नाही. भाड्याने राहण्यासाठी घर मिळत नाही. शासनाने सगळ्यांना जगण्याचा हक्क दिला आहे परंतु आमच्या हक्कावर गदा आणली आहे. प्रशासनाने आमची उदरनिर्वाहाची सोय करावी अशी मागणी कलाकेंद्र कलावंतांनी केली. प्रशासनाच्या कलाकेंद्र बंदच्या आदेशानंतर कलावंतांच्या उपोषणाचा रविवारी चौथा दिवस आहे. उपोषणकर्त्या मंगल जाधव, संजीवनी जाधव, अंबिका अंधारे या तिघींची प्रकृती खालावल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपोषणाच्या चौथ्या दिवशी आखिल महाराष्ट्र लोकनाट्य तमाशा थेअटरचे राज्य सचिव बाळासाहेब काळे यांनी उपोषणास पाठिंबा दिला. ते म्हणाले की, गरीब कलावंतांना शासन न्याय देत नाही. शासनाविरोधात राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. महाराष्ट्रात एकूण 60 कलाकेंद्र आहेत. प्रशासनाने फक्त मोहा हद्दीतील पाचच कलाकेंद्रावर बंदी आणून कलाकारांवर अन्याय केला आहे. कलाकेंद्र बंद करून लोककला संपवावी असा शासनाचा विचार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसतानाही कलाकारांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला.