वडवणी तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, वडवणी

शेतीसाठी घेतलेले बँकेच कर्ज सततच्या नापिकीमुळे फेडणे अशक्य झाले. मुलीच्या लग्नासाठी काही जमीन विकावी लागली. कर्जाचा डोंगर वाढतच गेला. त्यामुळे मानसिक तणावात असलेल्या पिंपरखेड येथील दामोदर गणपती शिंदे या बेचाळीस वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.

पिंपरखेड येथील दामोदर गणपती शिंदे यांना वडीलोपार्जित साडेचार एकर जमीन होती. पत्नी, दोन मले, एक मुलगी असलेल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करीत असत. शेतीसाठी व मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलत नसल्याने त्यांनी वडवणी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसह इतर खासगी बँकेचेही कर्ज उचलले होते. मात्र निसर्गाच्या अवकृपेने दुष्काळी परिस्थितीने व सततच्या नापिकीमुळे शेतात कोणतेही उत्पादन निघाले नाही. त्यामुळे कर्जाचा बोजा वाढत गेला. त्यातच दोन वर्षांपूर्वी मुलीच्या लग्नासाठी काही जमीन विकण्याची वेळ आली. बँकेचे कर्ज वाढत गेले. उर्वरित दोन एकर जमिनीत या वर्षी केलेला खर्चही देखील आला नाही. त्यामुळे कर्जाचा बोजा अधिकच वाढला.

या सगळ्यामुळे मागील काही दिवसात शिंदे तणावात होते. त्या तणावातूनच सोमवारी सकाळी शेतात जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहीती मिळताच वडवणी ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश खाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिंदे, बारगजे, वाघमारे यांनी पंचनामा केला. तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी मंडळ अधिकारी सुनिता राठोड यांच्यामार्फत घटनेचा अहवाल मागविला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.