योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात चार्‍या अभावी 200 गायींचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नोएडा

उत्तर प्रदेशमधील नोएडामध्ये एका गोशाळेत गेल्या दोन महिन्यात 200 गायींचा मृत्यू झाला आहे. चार्‍या अभावी आणि आजारपणामुळे या गायींचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

नोएडामध्ये गऊलोक नावाची गोशाळा आहे. ही गोशाळा 9 एकरमध्ये पसरली असून 10 वर्षापूर्वी ग्रेटर नोएडा ऑथोरिटीकडून ही गोशाळा सुरू करण्यात आली होती. गोरस फाऊंडेशन आणि ग्रेटर नोएडा ऑथोरिटी या दोघांकडून ही गोशाळा चालवली जाते. रस्त्यातील बेवारस गायींना गोशाळेत पाठवावे असे आदेश मुख्यमंत्री योगींनी दिले होते. त्यानंतर 1 जानेवारी ते 7 मार्च दरम्यान या गोशाळेत 800 गायी दाखल झाल्या. त्यानंतर गोशाळेत गायींची संख्या 1200 वर पोहोचली.

प्राथमिक माहितीनुसार योग्य चारा आणि बिघडलेल्या आरोग्यामुळे या गायींचा मृत्यू होत आहे. अनेक गायी या बेवारस असतात. त्यांना गोशाळेत आणल्यानंतर इतर गायींशी दाखल झालेल्या गायींची भांडणे होतात. आणि काही गायी यात जखमी होऊन मृत पावतात अशी माहिती गोशाळेच्या कर्मचार्‍यांनी दिली. तर अनेक गायी या बर्‍याच दिवसांपासून आजारी होत्या. आजारपणातच त्यांचा मृत्यू ओढवल्याचे कर्मचार्‍यांनी म्हटले. जेवढ्या प्रमाणात गायी या गोशाळेत दाखल होत आहे त्याच प्रमाणात चारा उपलब्ध होत नसल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले. तर ग्रेटर नोएडा ऑथोरिटिने ही बाब नाकारली असून गायींचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे म्हटले आहे. तसेच गोशाळेतील गायींची नियमित तपासणी होत असून गोशाळेला पाच लाख रुपयांचा निधी दिला असल्याचेही सांगितले.