
सामना प्रतिनिधी, मुंबई
राज्य सरकार आणि महापालिकेच्या समन्वयातून मुंबईतील 104 खासगी विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाचा प्रश्न लवकरच सोडवला जाणार आहे. याबाबत आज महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालिका आयुक्त अजोय मेहता आणि शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी समिती स्थापन करून अहवालानंतर तातडीने निर्णय घेण्यावर एकमत झाले.
पालिकेची मान्यता असलेल्या 104 खासगी विनाअनुदानित शाळांना राज्य सरकार किंवा पालिकेकडून कोणतेही अनुदान मिळत नसल्यामुळे या शिक्षकांना पगार मिळणे मुश्कील झाले आहे. गेल्या 20-25 वर्षांपासून काम करणाऱया शिक्षकांना केवळ चार-पाच हजारांत काम करावे लागत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे पालिकेने अनुदान द्यावे या मागणीसाठी गेल्या 28 दिवसांपासून शेकडो शिक्षकांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे.
या पार्श्वभूमीवर आज महापौर दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर, अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱहाड हेदेखील उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश दिल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर महाडेश्वर यांनी दिली. शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये शिक्षण समिती अध्यक्ष, शिक्षक प्रतिनिधी, अतिरिक्त आयुक्त, नगरसेवकांचा समावेश राहणार असल्याचे महापौर महाडेश्वर यांनी सांगितले.
आंदोलन स्थगित
दरम्यान, आज झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यामुळे आंदोलन स्थगित करीत असल्याचे शिक्षक प्रतिनिधी ज्योती तांदळे यांनी सांगितले. आगामी निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आम्ही आंदोलन स्थगित करीत असलो तरी प्रशासनाकडे पाठपुरावा मात्र सुरूच राहणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
तांत्रिक बाबी तपासणार
नेमण्यात आलेल्या समितीच्या माध्यमातून शिक्षकांच्या नियुक्त्या, शाळांची आरटीई नियमानुसार कार्यपद्धती सुरू आहे का, अनिवार्य नियम पाळले जात आहेत का, पुनर्मान्यता घेतलेली आहे का या बाबी तपासून अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे महापौर महाडेश्वर यांनी सांगितले. या तांत्रिक अडचणी सोडवल्यानंतर तातडीने निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले.


























































